Sun, Dec 08, 2019 21:56होमपेज › National › मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार : कुमारस्वामी

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार : कुमारस्वामी

Published On: Jul 23 2019 6:34PM | Last Updated: Jul 23 2019 7:30PM
बंगळूरू : पुढारी ऑनलाईन 

गेल्या २१ दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर थोड्याच वेळात पडदा पडणार आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुमारस्वामी सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यास सांगितले आहे. विश्वासदर्शक ठरावाआधी कुमारस्वामी यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी आनंदाने तयार असल्याचे म्हटले आहे.  

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीर पुढील ४८ तासांसाठी बंगळुरू शहरात सायंकाळी ६ वाजल्यापासून कलम १४४ (संचार बंदी) लागू करण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण शहरात मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस आयुक्त आलोक कुमार यांनी दिली आहे.  

'मी आनंदाने मुख्यंत्री पद सोडण्यास तयार आहे. परंतु, एका वृत्त वाहिनीने राज्यात भारनियमन करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे वृत्त दिले होते. अशी प्रमाणपत्र घेण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो होतो का? असा प्रश्न विचारत कुमारस्वामी म्हणाले की, राजीनामा देण्यासाठी मी आनंदाने तयार आहे. शिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ लावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी विधानसभा अध्यक्षांची आणि राज्यातील जनतेची माफी मागतो. 

पुढे बोलताना कुमारस्वामी म्हणाले, मी शेतकऱ्यांना धोका दिला नाही. बजेट मांडताना  सिद्धारामय्या यांनी केलेल्या कोणत्याही घोषणा मागे घेण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आम्ही आश्वासन दिले होते, त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसोबत बैठकही केली आहे. त्यासाठीच्या अनुदानालाही मंजुरी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून माहिती मागविली आहे. त्याप्रमाने अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आल्याचे बँकांनी मला सांगितले आहे. 

भाजपला खूप घाई आहे, आम्ही मतदान करणार आहे, मी पळून जाणाऱ्यांतील नाही. परंतु, चर्चा होवू द्या, लोकांना समजले पाहिजे की मी या भितीने पळून जाणार नाही. मी जिंकेन किंवा पराभूत होईन, मत विभाणी होण्याची मी चिंता करत नाही. मात्र मला बोलू दिले पाहिजे. असे मत कुमारस्वामी यांनी मांडले.