Fri, Mar 22, 2019 04:21
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'भाजपकडून आमदारांना १०० कोटी, मंत्रीपदाची ऑफर' 

'भाजपकडून आमदारांना १०० कोटी, मंत्रीपदाची ऑफर' 

Published On: May 16 2018 1:29PM | Last Updated: May 16 2018 1:29PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर कोणता पक्ष सत्ता स्‍थापणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव आणि आमदार रेवण्‍णा यांनी भाजपवर सौदेबाजीचा आरोप केला. भाजपने आमदारांना १०० कोटी आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्‍याचा आरोप रेवण्‍णा यांनी केला. भाजप वाईट राजकारण करत असल्‍याचे रेवण्‍णा यांनी म्हटलं आहे. 

आज १६ मे रोजी जेडिएसने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत कुमारस्‍वामी यांनीही भाजपच्‍या राजकारणावर टीका केली आहे. आमच्‍याकडे बहुमत असताना भाजप सत्ता स्‍थापन कशी करणार? असा प्रश्‍न कुमारस्‍वामी यांनी उपस्‍थित केला. जेडीएसच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. भाजप घोडेबाजार करत आहे. हा काळा पैसा कुठून येतो? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत? असा सवालही कुमारस्वामी यांनी यावेळी केला.  

कुमारस्वामी यांची जेडीएसच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे पक्षाच्या आमदरांबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जेडिएस आणि काँग्रेसच्या मिळून ११६ जागा होत आहेत. काँग्रेसने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या आधारावरच जेडीएस सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेतल्‍याचे कुमारस्‍वामी म्‍हणाले.