नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
२०१९ मधील प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून ट्रम्प यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासन या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत असून ट्रम्प यांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास मोदींच्या परदेश नीतीचे मोठे यश समजण्यात येईल.
अद्याप अमेरिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. यंदा एप्रिलमध्ये हे निमंत्रण भारत सरकारकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पाठविण्यात आले होते. ट्रम्प यांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास मोदी सरकारच्या काळात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणारे दुसरे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील. यापूर्वी २०१५ मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मोदी सरकारच्या काळातील पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.
ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास दोन्ही देशांत विविध महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे. निश्चितच ही चर्चा ओबामांच्या दौर्यापेक्षा अधिक नाटकीय स्वरुपाची असणार आहे. कारण सध्या जगभरातील सर्वच मोठ्या देशांसाठी अमेरिकेबरोबरचे संबंध स्थिर ठेवण्याचे आव्हान आहे. ट्रम्प यांचा स्वभाव बघता दुसर्या देशाच्या नेत्यांना त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आव्हान असताना भारताकडून वेगळा विचार सुरु असल्यास तो अपवाद ठरणार आहे.
भारत आणि अमेरिकेच्या संबंधातही सध्या काही आव्हाने आहेत. यात व्यापार शुल्क तसेच इरानशी असणारे भारताचे संबंध आणि तेलाचे राजकारण यावरून अमेरिका भारतावर नाराज आहे. त्यातच रशियाबरोबरच्या एस ४०० क्षेपणास्त्राच्या करारामुळे अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच राजकीय चर्चा सुरू करण्याचा मोदी-ट्रम्प भेटीतील प्रस्ताव अमेरिकेने पुढे ढकलल्यानेही दोन्ही देशांच्या संबंधात काहीसे संशयी वातावरण आहे.