Fri, Jul 10, 2020 01:15होमपेज › National › 'त्या' दिवशी हिंदूनी वाचवले होते अनेक मुस्लिमांचे प्राण! 

'त्या' दिवशी हिंदूनी वाचवले होते अनेक मुस्लिमांचे प्राण! 

Published On: Dec 06 2018 1:54PM | Last Updated: Dec 06 2018 1:54PM
अयोध्या : पुढारी ऑनलाईन 

देशाच्या इतिहासातील अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त असणाऱ्या बाबरी मशिदीला उद्धस्त होऊन आज २६ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर अनेक हिंदूनी मुस्लिम शेजाऱ्यांना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. तत्कालिन परिस्थितीमध्ये अयोध्येतील हिंदू पुजाऱ्यांनी हिंसक कारसेवकाना माघारी धाडून शेजारधर्म पाळल्याच्या अनेक आठवणी तात्या केल्या.

अनेक हिंदूनी शेजारी असलेल्या मुस्लिम कुटुंबियांची सुरक्षेची काळजी घेतलीच, पण तितक्यावर न थांबता त्यांना मंदिरात आश्रय दिला. त्यावेळी अयोध्येमध्ये साधारण साडे चार हजार मुस्लिम राहत होते. अयोध्येतील गोडीयानामध्ये ५० ते ६० मुस्लिम कुटुंबे होती, असे लेखक अनुराग शुक्ला यांनी सांगितले. ते म्हणतात की, मला अजूनही आठवते, हिंसक जमाव मुस्लिमांची घरे कोठे आहेत अशी विचारणा करीत होता, पण  रामचंद्र मिश्रा, राम शंकर शुक्ला आणि के.सी. श्रीवास्तव यांनी त्या जमावाला रोखले. त्या भागातील वरिष्ठ नागरिक असलेल्या या सर्वांनी हे मुस्लिम अनेक पिढ्यांपासून आमच्यासोबत राहत असल्याचे सांगत कुणालाही हात लावू दिला नाही. 

अयोध्या मुस्लिम कल्याण सोसायटीचे अध्यक्ष सादिक अली यांनी सुद्धा आठवणी सांगितल्या. हनुमान मंदिरात महंत आणि साधूंनी मुस्लिमांना जागा दिली. अनेक मुस्लिमांनी मंदिरांमध्ये सहारा घेतला. स्थानिक महतांनी अयोध्या पुर्वपदावर यईपर्यंत त्यांचे संरक्षण केल्याचे अली म्हणाले. पराग लाल यादव यांनीही आठवण सांगितली. बाबरी पाडण्यात आल्यानंतर जमावाने  राजघाट, मिरापूर, बुलंदी आणि दोराही कुआनमधील मुस्लिमांवर हल्ले करण्यास प्रारंभ केला. अनेक कुटुंबे आमच्याकडे आश्रयास आली. आम्ही त्यांना वाचविण्यासाठी मानवी साखळी केली. एकाने मुस्लिम समजून माझ्यावर हल्ला केला, पण आम्ही अनेक जीव वाचविण्यात यशस्वी झालो, असे यादव आठवणी ताज्या करताना म्हणाले.