होमपेज › National › केरळमध्ये पावसाचे थैमान सुरुच 

केरळमध्ये पावसाचे थैमान सुरुच 

Published On: Aug 10 2018 1:26PM | Last Updated: Aug 10 2018 1:20PMतिरुअनंतपुरम (केरळ) : पुढारी ऑनलाईन

नैसर्गिक देणगीने नटलेल्या केरळमध्ये पावसाने गेल्या काही दिवसांपासून घातलेल्या थैमानामध्ये २६ जण मृत्युमुखी पडले आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. लष्कर, एनडीआरएफ तसेच नौदलाला सुद्धा बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. 

नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हानिहाय कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली असून नौदल व लष्कराकडून इदुक्की व वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेण्यात आले. या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे इदुक्की धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पेरियार नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

पेरियार नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने कोची विमानतळामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. कोझीकोड आणि मल्लापुरम जिल्ह्यातही पावसाने उसंत घेतलेली नाही. बचावकार्यासाठी सैन्याची एक तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेकडून त्यांच्या नागरिकांना केरळला न जाण्याचा सल्ला दिला आहे.