Fri, Jul 10, 2020 18:54होमपेज › National › सांगलीतील शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; खा.संजय पाटलांची मागणी

सांगलीतील शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; खा.संजय पाटलांची मागणी

Last Updated: Nov 21 2019 3:27PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पीडित शेतकर्‍यांना केंद्र सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात केली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि महापुरात शेती पाण्याखाली गेल्याने केवळ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे असे नाही तर रब्‍बी हंगामातील पिकेही धोक्यात आली असल्याचे पाटील म्हणाले.
 
मान्सूनच्या जोरदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णेसह सर्वच नद्यांना महापूर आला होता. महापूर आणि अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे अनेक ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, अजुनही काही ठिकाणी पंचनामे सुरु आहेत. जिल्हा प्रशासनाकडील माहितीनुसार दहा तालुक्यातील 627 गावांमध्ये शेतीपिकाचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती खा. पाटील यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

खरिपातील ज्वारी, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहेच, पण तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजसह इतर तालुक्यातील फळपिकेही अवकाळीमुळे वाया गेली आहेत. अवेळी पडलेल्या पावसाचा फटका रब्‍बी हंगामाला बसला आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.