Sun, Apr 21, 2019 05:40होमपेज › National › 'आरबीआयकडे मागितले नाहीत ३.६ लाख कोटी'

'आरबीआयकडे मागितले नाहीत ३.६ लाख कोटी'

Published On: Nov 09 2018 3:58PM | Last Updated: Nov 09 2018 4:30PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

रिझर्व्ह बँकेकडे ३.६ लाख कोटी मागितले नव्हते, असा खुलासा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. केवळ सेंट्रल बँकेची आर्थिक घडी बसविण्याबाबत आरबीआयशी चर्चा झाली होती, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींना त्यांच्या विलक्षण आर्थिक सिद्धांतामुळे निर्माण झालेली  अर्थव्यवस्था ठीक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ३.६ लाख कोटी हवे आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. एका वृत्ताचा हवाला देत त्यांनी हा आरोप केला होता. त्यावर आता केंद्र सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

''मीडियामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सरकारचे आर्थिक गणित पूर्णपणे ट्रॅकवर आहे. ३.६ किंवा १ लाख कोटी हस्तांतरित करण्याबाबत आरबीआयकडे कसलाही प्रस्ताव पाठविला नव्हता,'' असे आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

३१ मार्च २०१९ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. २०१३-१४ मध्ये वित्तीय तूट ५.१ टक्के एवढी होती. २०१४-१५ नंतर सरकारला वित्तीय तूट कमी करण्यास यश आले आहे. २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षात ही तूट ३.३ टक्क्यांपर्यंत कमी केली जाईल, असेही गर्ग यांनी म्हटले आहे.