Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › National › राम मंदिराची पायाभरणी २१ फेब्रुवारीला

राम मंदिराची पायाभरणी २१ फेब्रुवारीला

Published On: Feb 12 2019 1:13AM | Last Updated: Feb 11 2019 11:51PM
अयोध्या : वृत्तसंस्था

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुद्दा चर्चेत आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती 17 फेब्रुवारीला प्रयागहून अयोध्येकडे रवाना होणार आहेत. शंकराचार्यांसमवेत अन्य संत प्रतापगड आणि सुलतानपूरमार्गे 19 फेब्रुवारीला अयोध्येत दाखल होतील. त्यानंतर 20 फेब्रुवारीला विराट सभेचे आयोजन केले जाईल आणि 21 फेब्रुवारीला राम मंदिराची पायाभरणी सुरू होईल. शंकराचार्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, राम मंदिर उभारण्यासाठी अयोध्येतील पायाभरणीचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत टाळला जाणार नाही. आवश्यकता पडल्यास तुरुंगात जाण्यासही तयार असेन. 

शंकराचार्य स्वरूपानंद यांनी सर्व रामभक्‍तांना एक-एक दगड घेऊन अयोध्येतील नियोजित पायाभरणी कार्यक्रमासाठी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी अखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि रामानंद संप्रदायाच्या संतांचाही पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला असून या सर्वांसोबत अयोध्येकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी हटले आहे. शंकराचार्यांनी सांगितले की, या यात्रेला ‘राम आग्रहासाठी अयोध्या प्रस्थान’ असे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम सत्याग्रहाच्या धर्तीवरच होईल. संत अयोध्येला केवळ भूमिपूजनासाठीच नाही; तर राम मंदिर उभारण्याचा संदेश देण्यासाठीही जात आहेत. कारण, आता यामध्ये कोणतीही अडचण नाही. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना या मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत असल्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना शंकराचार्य म्हणाले की, निवडणुका तर सातत्याने होतच असतात. अशावेळी आम्ही काय प्रतीक्षाच करत राहायचे का? वादग्रस्त जागेवर मंदिर होते हे उच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केले आहे. न्यायालयातही आमचे वकील बाजू मांडत आले आहेत. त्यामुळे या लढाईसाठी आम्ही नवीन आहोत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. रामालय ट्रस्टशीही आम्ही जोडलेलो आहोत, असेही शंकराचार्यांनी नमूद केले. 

हिंदू आता सर्व काही सहन करणारा नाही

शंकराचार्यांच्या समर्थनार्थ येथे पोहोचलेले जगद‍्गुरू रामानंदाचार्य स्वामी राम नरेश आचार्य म्हणाले की, आता हिंदू पूर्वीचा हिंदू राहिलेला नाही, जो सर्वकाही सहन करेल. आता तो आपला अधिकार मिळवणेही जाणतो.