Sat, Aug 24, 2019 11:02होमपेज › National › नोटाबंदीच्या जखमा चिघळणार : डाॅ. मनमोहन सिंग

नोटाबंदीच्या जखमा चिघळणार : डाॅ. मनमोहन सिंग

Published On: Nov 08 2018 4:41PM | Last Updated: Nov 08 2018 6:47PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २०१६ मधील नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला ज्या जखमा झाल्या त्या अद्याप भरून निघालेल्या नाहीत. उलट या जखमा काळानुसार अधिकच चिघळत आहेत, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आज गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरात निदर्शने केली आहेत. अर्थव्यवस्थेला धोका पोहचल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यावर डॉ. सिंग यांनी म्हटले आहे की, सरकारने आर्थिक धोरणांत विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणली पाहिजे. आजच्या दिवशी आम्ही स्मरणात ठेवू शकतो की एका चुकीच्या निर्णयाचा देशाला दीर्घकाळ कसे चटके बसू शकतात. नोटाबंदीमुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांची स्थिती कोलमडली आहे. यामुळे बिगर वित्तीय, आर्थिक बाजारातील सेवा आणि तरुणाईंच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोणताही विचार न करता २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय लादला. याचा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजावर गंभीर परिणाम झाला आहे. याचे चोहोबाजूंनी नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.