Thu, May 23, 2019 22:13
    ब्रेकिंग    होमपेज › National › ..तर मला माफ करा : दलाई लामा

..तर मला माफ करा : दलाई लामा

Published On: Aug 10 2018 12:29PM | Last Updated: Aug 10 2018 12:29PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था

तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामांनी महात्‍मा गांधी आणि मोहम्‍मद अली जिना यांच्यावरून केलेले वक्‍तव्य वादग्रस्‍त ठरल्यानंतर यावर माफी मागितली. जर या वक्‍तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील आणि यामध्ये काही चुकीचे असल्यास मी माफी मागतो, असे ८३ वर्षीय दलाई लामा म्‍हणाले. 

तिबेटमधून निर्वासित धर्मगुरु दलाई लामा यांनी बुधवारी गोव्यातील कार्यक्रमात वादग्रस्‍त वक्‍तव्य केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याठिकाणी मोहम्‍मद अली जिना यांना स्‍वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती. महात्‍मा गांधींची इच्‍छा होती की जिनांनी देशातील सर्वोच्‍च पद सांभाळावे, परंतु यावेळी नेहरूंनी आत्‍मकेंद्री धोरण अवलंबले, असे लामा म्‍हणाले होते. 

दलाई लामांच्या या विधानानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला. काही राजकीय पक्षांनी यावर नाराजी व्यक्‍त केली. गोव्यातील एका कार्यक्रमात दलाई लामांना विचारलेल्या एका प्रश्‍नावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्‍त विधान केले होते. "माझं असं मत आहे की सरंजामशाहीऐवजी लोकशाही व्यवस्‍था खूप चांगली आहे. सरंजामशाहीत निर्णय प्रक्रिया काही लोकांच्या हातात केंद्रीत असते. ते खूप धोकादायक असते," असे सांगतानाच लामा यांनी भारताचे उदाहरण दिले. 

तिबेटी धर्मगुरु म्‍हणाले की, "आता भारताकडेच पाहा. मला वाटतं की महात्‍मा गांधी जिनांना पंतप्रधानपद देण्यासाठी उत्‍सुक होते. पंरतु नेहरूंनी ते मान्य केलं नाही. नेहरुंचं स्‍वत:ला पंतप्रधानाच्या रुपात पाहणं हे त्यांचं आत्‍मकेंद्री धोरण होतं. जर महात्‍मा गांधींचं म्‍हणणं ऐकलं असतं तर भारत आणि पाकिस्‍तान आता एक असते." ते पुढे म्‍हणाले की, मी नेहरूंना चांगल्या प्रकारे ओळखतो. ते खूप अनुभवी आणि बुद्धीमान व्यक्‍ती होते, परंतु काही वेळा चुका होतात."  एका विद्यार्थ्याने योग्य निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नावार उत्तर देताना दलाई लामांनी दिलेला हा दाखला वादग्रस्‍त ठरला होता.