Sun, Mar 24, 2019 03:13होमपेज › National › पुन्हा एकदा चलन तुटवडा; महाराष्ट्रासह देशभरात ATMमध्ये ठणठणाट!

महाराष्ट्रासह देशभरात ATMमध्ये ठणठणाट!

Published On: Apr 17 2018 11:29AM | Last Updated: Apr 17 2018 11:47AMमुंबई/हैदराबाद/पाटना/भोपाळ/बेंगळुरु: पुढारी ऑनलाईन

नोटाबंदी केल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठीच्या रांगा तुम्हाला आठवत असतील. नोटाबंदीला दीड वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधील चलन तुटवड्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. अशाच प्रकारचा चलन तुटवडा आता पूर्व महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्ये देखील निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चलन पुरवठा करण्यात आल्यानंतरही हा तुटवडा निर्माण झाल्याने काळजी वाढली आहे. राजधानी दिल्लीत देखील नागरिकांना चलन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. गुडगाव येथे 80 टक्के एटीएममध्ये पैसे नसल्याचे समोर आले आहे.  

आरबीआयने नोटाबंदीनंतर 5 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोटा चलनात आणल्या होत्या. या नोटा चलनात आल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. पण हे संकट आता पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. काही बँकांच्या मते चलन जमा करण्याच्या सवयीमुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. 

आरबीआयच्या माहितीनुसार 6 एप्रिल रोजी 18.2 लाख कोटी रुपये चलनात होते. ही आकडेवारी नोटाबंदीच्या आधी बाजारात असलेल्या चलना इतकी होती. देशात आवश्यक प्रमाणात चलन उपलब्ध आहे. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिल्यामुळे प्रत्यक्षात चलनाची मागणी कमी झाली होती. पण आता निर्माण झालेल्या चलन टंचाईमुळे काळजी वाढली आहे. जेव्हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मार्च महिन्यात चलन तुटवड्याच्या बातम्या आल्या होत्या. पण तेव्हा याकडे फार गांभिर्याने घेतले गेले नाही.  

पैसे काढण्याचे प्रमाण वाढले 

सर्वसामान्य परिस्थितीत निवडणुकीच्या काळात पैशाचे व्यवहार अधिक होतात. पण आता केवळ कर्नाटकातच निवडणुका होणार आहेत. जेव्हा बँकेत पैसे कमी भरले जातात आणि अधिक प्रमाणात काढून घेतले जातेत तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते अस काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात डिपॉझिट 6.7 टक्के इतका होता. 2016-17मध्ये हा दर 15.3 टक्के इतका होता. तर याउलट 2018 या आर्थिक वर्षात पैसे काढून घेण्याचे प्रमाण 10.3 टक्के इतके होते. हेच प्रमाण 2016-17 या आर्थिक वर्षात 8.2 टक्के इतके होते. 

Tags: Currency Shortage, Maharashtra, Gujrat, Madhya Pradesh