कोलकाता : पुढारी ऑनलाईन
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रस्तावित पश्चिम बंगालमधील रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. कुच बेहारमधून रथ यात्रेला अमित शहा प्रारंभ करणार होते. भाजपकडून सात डिसेंबरपासून तीन रॅलींचे आयोजन करण्यासाठी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकार आणि पोलिसांकडे परवानगी मागितली होती. दोन्हींकडून रॅलीसाठी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भाजपने काल उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वाचा : 'त्या' दिवशी हिंदूनी वाचवले होते अनेक मुस्लिमांचे प्राण!
प्रस्तावित रथ यात्रेमुळे जातीय सलोखा बिघडू शकतो असे राज्य सरकारकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले, तर भाजपकडून शांततेत रथयात्रा काढण्यात येईल, असे म्हटले होते. न्यायमूर्ती तापब्रत चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. न्यायाधीशांनी भाजप वकील अनिद्य मित्रा यांना काही अघटीत घडल्यास जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली. यावर भाजप वकीलांनी रॅली शांततेत आयोजित करण्यात येतील, पण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याची भूमिका मांडली.
वाचा : धक धक गर्ल माधुरी 'पुणेकर' होणार ?
भाजप अध्यक्ष अमित शहांच्या प्रस्तावित 'लोकशाही वाचवा रॅली' मोहिमेला उद्या प्रारंभ होणार होता. कुचबिहार जिल्ह्यात सात डिसेंबरला, तर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील काकद्वीपासून नऊ डिसेंबरला आणि बिरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिरापासून १४ डिसेंबरला रथयात्रा आयोजित करण्यात आली होती.