Fri, Mar 22, 2019 03:10
    ब्रेकिंग    होमपेज › National › ...म्‍हणून नोटांचा तुटवडा : अरुण जेटली

...म्‍हणून नोटांचा तुटवडा : अरुण जेटली

Published On: Apr 17 2018 1:59PM | Last Updated: Apr 17 2018 2:12PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

देशातील काही राज्यांमध्ये नोटाबंदीनंतर पुन्‍हा एकदा चलन तुटवडा जाणवत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेशनंतर आता पूर्व महाराष्‍ट्र, बिहार आणि गुजरातमधील एटीएममधील पैसे संपले आहेत. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्‍विट करून स्‍पष्‍टीकरण दिले आहे. 

सरकारने देशातील चलन स्‍थितीची माहिती घेतली आहे. सध्या देशात गरजेपेक्षा अधिक नोटा व्यवहारात आहेत. बँकांमध्येही मुबलक नोटा आहेत. परंतु, काही राज्यात नोटांची मागणी अचानक वाढल्याने चलन तुटवडा निर्माण झाला आहे, असे अर्थमंत्ती अरुण जेटली यांनी म्हटले आहे. 

तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रसाद शुक्‍ला यांनी काही ठिकाणी नोटांची कमतरता आहे, हे मान्य केले. ते म्‍हणाले की, काही राज्यांत नोटांचा असणारा तुटवडा तीन दिवसांत संपेल. काही राज्यांत गरजेपेक्षा कमी नोटा पोहोचल्या आहेत. सरकार अशा राज्यांमध्ये इतर राज्यांतून गरजेनुसार नोटा पुरविण्याचा प्रयत्‍न करत आहे. सरकारकडे १ लाख २५ हजार कोटी रुपयांच्या चलनी नोटा आहेत, असे शुक्‍ला यांनी सांगितले. 

रिझर्व्‍ह बँकेकडून समिती गठित

चलन तुटवड्याच्या समस्येवर उतारा शोधण्यासाठी रिझर्व्‍ह बँकेने एका समितीची स्‍थापना केली आहे. ही समिती येत्या तीन दिवसांत इतर राज्यांतून नोटा घेऊन त्या तुटवडा असणार्‍या राज्यांत पोहोचवणार आहे. त्यामुळे लवकरच चलन तुटवडा संपुष्टात येईल, असे रिझर्व्‍ह बँकेचे म्‍हणणे आहे. 

काय आहे चलन तुटवड्याचं खरं कारण?

चलन तुटवड्याच्या परिस्‍थितीवर बोलताना रिझर्व्‍ह बॅक अधिकार्‍यांच्या समितीने सांगितले की, सध्या देशात ३० ते ४० टक्‍के चलनाचा तुटवडा आहे. हा तुटवडा रिझर्व्‍ह बँकेने सातत्याने डिजिटल इकोनॉमीचा आग्रह धरल्याने निर्माण झाला आहे. केंद्र सरकार आणणार असणार्‍या एफआरडीआय या बिलाविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे लोकांनी आपले पैसे बॅंकांतून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे, असेही या संघटनेचे म्‍हणणे आहे.

Tags : Arun Jaitley, cash crunch, india, finance minister, reserve bank