Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › National › सुब्रह्मण्यम स्वामींच्‍या निशाण्‍यावर दीपिका 

सुब्रह्मण्यम स्वामींच्‍या निशाण्‍यावर दीपिका 

Published On: Nov 15 2017 1:09PM | Last Updated: Nov 15 2017 1:22PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बहुचर्चित चित्रपट पद्मावतीला देशभरातून विरोध होत आहे. यावर कालच दीपिकाने 'पद्मावती' प्रदर्शित होण्‍यास कोणीही रोखू शकत नाही, असे ठामपणे म्‍हटले आहे. तसेच 'पद्मावती'च्या वादाबाबत बोलताना दीपिका म्हणाली होती, ‘हे खूपच भयानक आहे, या वादातून काय निष्‍पन्‍न झाले. एक राष्ट्र म्हणून आपण कुठे पोहोचलो आहोत. आपण पुढे जाण्‍याऐवजी मागे जात आहोत.' दीपिकाच्‍या या वक्‍तव्‍यानंतर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दीपिकावर निशाणा साधला आहे. स्‍वामी यांनी ट्‍विट करत म्‍हटले आहे, 'अभिनेत्री दीपिका पादुकोण देशात बदल घडवून आणण्‍याबाबत भाषण देत आहे. देशात तेव्‍हाच सुधारणा होऊ शकते, जेव्‍हा त्‍या आपला दृष्‍टिकोण बदलतील.'

देशभरात 'पद्मावती' चित्रपटावरुन वाद सुरु आहे. या वादावर दीपिकाने ट्‍विट करत म्‍हटले होते, 'पद्मावती प्रदर्शित होणारच. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डला उत्तर देण्यास बांधील आहोत. मला माहित आहे की, 'पद्मावती'ला प्रदर्शित होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तसेच हा चित्रपट ऐतिहासिक आहे. त्‍यामुळे लोकांचे याला समर्थन मिळेलच. लोकांना ही कथा सांगण्याचा मला अभिमान आहे. आणि एक महिला म्हणूनही मी या चित्रपटाचा एक भाग आहे.’

दरम्‍यान, एका ट्‍विटर युजरने दीपिकावर टीका केली आहे. त्‍याने ट्‍विट करत म्‍हटले आहे...'ती (दीपिका पादुकोण) नेदरलँडची नागरिक आहे.' 

हाच मुद्‍दा धरुन स्‍वामी यांनी दीपिकावर टीका केली आहे. त्‍यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटले आहे, 'जर हे खरे असेल तर तिला (दीपिका) याचा खुलासा करायला पाहिजे.' 

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी दिग्‍दर्शित पद्मावती चित्रपटात इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणीही त्‍यांच्‍याकडून करण्‍यात आली आहे. या परिस्‍थितीतही पद्मावती १ डिसेंबरला प्रदर्शित होणारच असा विश्‍वास दीपिकाने व्‍यक्‍त केला आहे.