Wed, Jul 17, 2019 15:56होमपेज › National › ...आणि प्रादेशिक पक्षांना मिळाले बळ; महाआघाडीसाठी नायडू भेटले देवेगौडांना

...आणि प्रादेशिक पक्षांना मिळाले बळ; महाआघाडीसाठी नायडू भेटले देवेगौडांना

Published On: Nov 08 2018 3:47PM | Last Updated: Nov 08 2018 6:04PMबंगळूर (कर्नाटक) : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएस युतीला यश मिळाले. या निकालानंतर देशभरात भाजप विरोधात महाआघाडी बनविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषतः २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाआघाडी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांना काही महिन्यांचाच अवधी उरलेला असताना, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय स्तरावर महाआघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. कर्नाटकमधील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी आज गुरुवारी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी उपस्थित होते. 

या भेटीनंतर देवेगौडा यांनी म्हटले आहे की, सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष नेत्यांनी एकजुटी दाखविण्याची गरज आहे. काँग्रेसचा १७ राज्यांत पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल.

याआधी नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांची भेट घेऊन महाआघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपला एकट्याने टक्कर देणे शक्य नाही, अशी चिंता प्रादेशिक पक्षांना वाटते. मात्र, आता कर्नाटकातील पोटनिवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. यामुळे ते परस्परांमधील मतभेद विसरून एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी विरोधकांची एकी दिसून आली होती. आता पोटनिवडणुकीत ४-१ असा विजय मिळवल्यामुळे प्रादेशिक पक्ष वेगळी रणनिती आखत आहेत. मुख्यतः मायावती यांचा बहुजन समाज पक्ष भाजप विरोधातील महाआघाडीत सामील होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रीय स्तरावर मतभेदांची भिंत...!
मध्य प्रदेशमध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे काँग्रेस आणि बीएसपी यांच्यात युती झालेली नाही. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा याआधीच केली आहे. या घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाआघाडी होण्याबाबत प्रश्नचिन्हही निर्माण होत आहे.

प्रादेशिक एकत्र आले तरच भाजपसमोर आव्हान...?
बिहारमध्ये समाजवादी पक्ष आणि बीएसपी एकत्र येऊ शकलेले नाहीत. ज्यावेळी प्रादेशिक एकत्र येऊन रणनिती आखतील. तेव्हाच ते भाजपला आव्हान देऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.