Sun, May 31, 2020 22:31होमपेज › National › लॉकडाऊनमुळे तब्बल २४ वर्षानंतर 'ते' आपल्या घरी परतले!

लॉकडाऊनमुळे तब्बल २४ वर्षानंतर 'ते' आपल्या घरी परतले!

Last Updated: May 23 2020 10:14PM

file photoबागेश्वर (उत्तराखंड) : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. गाव सोडून शहरात स्थायिक झालेल्या काही लोकांनी तर गावाकडे कायमची पाठच फिरवली होती. पण आता कोरोनाच्या संकटात गावच सुरक्षित वाटू लागल्याने लोंढेच्या लोंढे गावाकडे परतत आहेत. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील रमाडी गावातील प्रकाश सिंह कार्कि (वय ४३) हे तर तब्बल २४ वर्षानंतर घरी परतले आहेत. त्यांनी २४ वर्षापूर्वी घरच्यांना न सांगताच घर सोडले होते. ते १८ मे रोजी गुजरात वरून त्यांच्या मूळ गावी परतले. ते इतक्या वर्षांनी घरी परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आनंदाचा सुखद धक्काच बसला.

विशेष म्हणजे ते गावात पोहोचल्यानंतर त्यांना सुरुवातीला कोणीच ओळखले नाही. गाव प्रमुख गणेश कुमार यांना देखील प्रकाश यांची ओळख पटली नाही. ज्यावेळी गाव प्रमुखाने ओळख विचारली तेव्हा त्यांनी आपले आई-वडील आणि दोन भावांची नावे नावे सांगितली. त्यानंतर कुमार यांनी प्रकाश यांच्या आईला फोन करुन बोलावले. प्रकाश सिंह यांना त्यांच्या आईने ओळखले. तब्बल दोन दशकांहून अधिक काळानंतर आपला मुलगा घरी परतल्यामुळे प्रकाश यांच्या ६८ वर्षाच्या आई बछुली देवी खूप आनंदात आहेत. 

''१९९५ मध्ये आपला मुलगा कोणालाही न सांगता घर सोडून गेला. त्याचा आम्ही खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही फायदा झाला नाही. त्यानंतर आम्ही आशा सोडून दिली. मात्र, आता माझा मुलगा परत आला आहे. यावर माझा विश्वास बसत नाही. देव महान आहे. कारण माझा मुलगा परत आला आहे.'', अशा भावना प्रकाश सिंह यांच्या आईने व्यक्त केल्या.