Sun, Jun 07, 2020 11:09होमपेज › National › भाजपने बाहेरून गुंड आणून कोलकातामध्ये केला हिंसाचार; तृणमूलचा पलटवार

'भाजपचा बाहेरून गुंड आणून हिंसाचार'

Published On: May 15 2019 3:09PM | Last Updated: May 15 2019 3:44PM
कोलकाता : पुढारी ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवर काल कोलकातामध्ये दगडफेक झाली होती. या दगडफेकीनंतर आज (ता.१५) अमित शहा यांनी दिल्लीतून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. त्यावर आज तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओ. ब्रायन यांनी पत्रकार परिषद घेत अमित शहा यांच्यावर पलटवार केला. 

अमित शहा पश्चिम बंगालमध्ये बाहेरून गुंड घेऊन आले. भाजपच्या या गुंडानीच ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली, असा दावा ब्रायन यांनी करत याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे, असेही ते म्हणाले. 

भाजपने बंगालमध्ये बाहेरून गूंड आणले. तजिंदर सिंह बग्गा कोण आहे? याला अटक केली होती. ज्याने दिल्लीत एकाला थप्पड मारली होती तो हाच आहे, असा दावा ब्रायन यांनी करत भाजपवर निशाणा साधला. 

भाजपने जे काही केले ते व्हिडिओतून स्पष्ट दिसते. तसेच अमित शहा हे खोटे बोलत आहेत हे सिद्ध होते. कोलकाता येथे काल जो हिंसाचार झाला त्यामुळे बंगालच्या अस्मितेला धक्का बसला आहे, असे ब्रायन यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये काल, अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. रोड शो दरम्यान अमित शहा उभा असलेल्या ट्रकवर काठ्या फेकल्या आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. त्यानंतर जाळपोळीचे प्रकारही घडले. या दरम्यान भाजप, डाव्यांची विद्यार्थी संघटना आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे कार्येकर्ते एकमेकांना भिडले. पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्येही झटापट झाली. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. या हिंसाचारानंतर अमित शहा यांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.