थिरुअनंतपुरम : पुढारी ऑनलाईन
केरळमधील ऐतिहासिक सबरीमाला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करूनही अत्यंत आक्षेपार्ह विधाने करण्याचे सत्र सुरूच आहे. मल्याळम अभिनेता कोल्लाम थुलासी यांनी अत्यंत वादग्रस्त आणि हिंसक विधान करून आणखी त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल : सबरीमाला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश मिळणार!
सबरीमाला मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करण्याचे धाडस केल्यास त्यांचे दोन तुकडे करून त्यामधील एक तुकडा दिल्लीला आणि दुसरा तुकडा केरळ मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी फेकला पाहिजे असे अत्यंत प्रक्षोभक विधान केले. अभिनेते थुलासी भारतीय जनता पक्षाचे पाठीराखे आहेत. भाजपने आयोजित केलेल्या सबरीमाला बचाव रॅलीमध्ये त्यांनी हे विधान केले.
वाचा : सबरीमाला निर्णयावर न्यायमूर्ती मल्होत्रा असहमत
सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबरला ऐतिहासिक निर्णय देताना सर्वच वयोगटातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिले होता. या निर्णयानंतर केरळमधील सर्वच विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. यामध्ये काँग्रेस, भाजप तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचा यामध्ये समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राज्य सरकारने विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावताना पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचा ठाम पवित्रा घेतला आहे.