Mon, Jun 17, 2019 10:29होमपेज › National › साठ वर्षांत घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले

साठ वर्षांत घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले

Published On: Jan 13 2019 1:43AM | Last Updated: Jan 13 2019 12:39AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगवान आगेकूच करीत आहे. भारतास विश्‍वगुरू बनविण्याचे स्वप्न मोदींच्या नेतृत्वाखाली साकार होईल, याचा मला विश्‍वास वाटतो. देशात साठ वर्षांत जे घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी रामलीला मैदानात भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय ठराव मांडताना सांगितले.

गडकरी म्हणाले की, एकविसावे शतक हे भारताचे असेल, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी मला खात्री वाटते. देशात 2014 पूर्वी भ्रष्टाचाराचा बोलबाला होता, देशास धोरणलकवा आला होता. दूरदृष्टी नसलेले नेतृत्व देशात राज्य करीत होते. अनेक वर्षे एकाच परिवाराने राज्य केले. मात्र, देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यात त्यांना यश मिळाले नाही. 

2014 साली पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या मार्गावर जोरदार घोडदौड सुरू केली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांच्या आरक्षणास धक्‍का न लावता आर्थिक दुर्बल वर्गास आरक्षण देण्यात आले. तिहेरी तलाकचे विधेयक मांडले. दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरतावाद कमी करण्यात यश मिळविले. पंतप्रधान मोदी यांनी देशास धोरणलकव्यातून बाहेर काढत चेहरामोहरा बदलण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.

जातीयवाद आणि घराणेशाही याविरोधात मोदींनी मोहीम उघडली आहे. 2019ची लोकसभा निवडणूक भाजपने जिंकल्यास पुढील दीर्घकाळ देशात पंचायत ते संसद भाजपचे राज्य असेल, असा मला विश्‍वास वाटतो. भाजपसोबत ‘रालोआ’तील 35 घटकपक्षांची ताकद असल्याचे सांगत त्यांनी, विरोधकांच्या महाआघाडीलाही यावेळी आव्हान दिले. भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू करण्याचे आदेश शहा यांनी दिले. 22 कोटी लाभार्थींशी संवाद साधून 22 कोटी घरांमध्ये एकाच दिवशी दिवा लावत ‘कमल दीपावली’सह अन्य उपक्रम राबविण्याचेही शहा यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.

2019 जिंकल्यावर पुढचा दीर्घकाळ भाजपाचा :

शहा : पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, 2014 मध्ये देशात मोठे परिवर्तन झाले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त केला आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सकारात्मक नसले, तरीही भाजपने आपला पाया गमावलेला नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, लोकसभेत या तीन राज्यांमध्ये भाजपला पुन्हा विजय मिळेल.

अडवाणींना दिली मानवंदना

भाजपचे भीष्माचार्य अशी ओळख असलेले माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची लोकप्रियता आजही अबाधित असल्याचे दिसून आले. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ असे नारे देत जल्लोष करीत अडवाणी यांना मानवंदना दिली. तसेच पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शहा यांनीदेखील त्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.