Sat, Nov 17, 2018 18:49होमपेज › National › आता सिमकार्डशिवाय साधा कोणत्याही दूरध्वनीवर संपर्क!

BSNLचा अनलिमिटेड प्लॅन; सिमकार्डशिवाय कॉल

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 11:11AMनवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

सरकारी दूरसंचार कंपनी म्हणून ओळख असणार्‍या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आता  इंटरनेट टेलिफोनीचे पर्व सुरु केले असून, ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपवरुन म्हणजे कोणत्याही सिमकार्डशिवाय भारतातील कोणत्याही फोन क्रमांकावर संपर्क साधता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची सेवा देणारी बीएसएनएल देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे.

बीएसएनएलने ग्राहकांसाठी ‘विंग्ज’ नावाचे मोबाईल अ‍ॅप सादर केले असून त्याद्वारे देशात कोणत्याही लॅण्डलाईन फोनवर संपर्क साधता येईल. यापूर्वी अशी सेवा केवळ विशिष्ट अ‍ॅपद्वारे विशिष्ट मोबाईल क्रमांकांसाठी मिळत होती. मात्र, अशा अ‍ॅपवरुन लॅण्डलाईनवर संपर्क साधता येत नव्हता. या सुविधेमुळे बीएसएनएल वायफाय किंवा अन्य सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सहाय्याने देशातील कोणत्याही नेटवर्कवर संपर्क साधता येणार आहे. या सुविधेसाठी नोंदणी प्रक्रिया या आठवड्यातच सुरु होणार असून 25 जुलैपासून सेवा कार्यान्वित केली जाईल.

या सेवेचा शुभारंभ दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आला. सिन्हा म्हणाले, दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असतानाही बीएसएनएलने आपला ग्राहकांचा टक्‍का वाढवला हे कौतुकास्पद आहे आणि आता इंटरनेट टेलिफोनी आणल्याबद्दल मी बीएसएनएल व्यवस्थापनाचे खास अभिनंदन करतो.

या प्लॅनद्वारे एका वर्षासाठी अमर्याद 

ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग करता येणार आहे. ही सेवा 1,099 रुपये एकदाच भरून सुरू करता येईल. त्याचबरोबर लँडलाईनच्या दरात आंतरराष्ट्रीय कॉल करता येणार आहे. मात्र त्यासाठी 2 हजार रुपयांची अतिरिक्‍त अनामत ठेव ठेवावी लागणार आहे.

सध्या बीएसएनएलचे 11 कोटी मोबाईलधारक ग्राहक आहेत. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बीएसएनएलने ही नवीन योजना आणली आहे.