Wed, Feb 26, 2020 20:23होमपेज › National › हैदराबाद एन्काऊंटरची 'एसआयटी'मार्फत चौकशी; 'या' मराठी आयपीएस अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

हैदराबाद एन्काऊंटरची 'एसआयटी'मार्फत चौकशी; 'या' मराठी आयपीएस अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

Last Updated: Dec 09 2019 10:14AM

रचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवतहैदराबाद : पुढारी ऑनलाईन

डॉक्टर युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिला जिवंत पेटवून देणाऱ्या चौघा नराधमांचा गेल्या शुक्रवारी सकाळी हैदाराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या एन्काऊंटरच्या चौकशीसाठी तेलंगाना सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या एसआयटीचे प्रमुख म्हणून रचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भागवत हे मराठी आयपीएस अधिकारी असून ते रचकोंडाचे पोलिस आयुक्त म्हणून काम करत आहेत.

पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीमध्ये त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हैदराबाद एन्काऊंटरमध्ये चार आरोपींना ठार केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली. त्यांच्या ७ सदस्यीय पथकाने बलात्कार झालेले ठिकाणी आणि पोलिसांनी केलेला एन्काऊंटर या दोन्ही ठिकाणांची गेल्या शनिवारी पाहणी केली. 

दरम्यान, एन्काऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल झाली आहे. तसेच तेलंगाना उच्च न्यायालयात आज (दि.९) आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी सुनावणी होणार आहे. याआधी न्यायालयाने एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत आज सकाळी ८ वाजता संपली. यावर आज सुनावणी होत आहे.  

पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केलेल्या कामगिरीचे लोकांनी कौतुक केले आहे. या एन्काऊंटरवरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. हैदराबादमधून पोलिसांच्या भूमिकेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असले, तरी काहींनी याला कडाडून विरोध केला आहे.