Thu, May 23, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › National › आरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याच्या निर्दोष मुक्ततेला SCमध्ये आव्हान

आरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याच्या निर्दोष मुक्ततेला SCमध्ये आव्हान

Published On: Aug 10 2018 1:37PM | Last Updated: Aug 10 2018 1:37PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशभर गाजलेल्या तेरा वर्षीय आरुषी हत्याकांड प्रकरणी डॉ. नुपूर आणि राजेश तलवार यांच्या निर्दोष मुक्ततेला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सीबीआयची आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज हत्याकांड प्रकरणातून नुपूर आणि राजेश तलवार यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर तलवार दाम्पत्याची गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी गाझियाबाद येथील तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यामुळे तलवार दाम्पत्याच्या अडचणी आता वाढू शकतात.

१६ मे २००८ रोजी नोएडा येथील निवासस्थानी आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांचा खून झाला होता. त्यानंतर नोकर हेमराजचा मृतदेह १७ मे रोजी टेरेसवर सापडला होता. देशभर हे हत्याकांड गाजले होते. या प्रकरणी २३ मे रोजी डॉ. राजेश तलवार यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली होती. सीबीआयच्या चौकशीच्या आधारावर गाझियाबाद येथील सीबीआय न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषी- हेमराज हत्या प्रकरणी तलवार दाम्पत्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निवाड्याला तलवार दाम्पत्याने अलाहाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर या न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आता पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले आहे.