Sun, May 31, 2020 12:40होमपेज › National › जम्मू- काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक, ६ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू- काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक, ६ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

Published On: May 16 2019 9:53PM | Last Updated: May 16 2019 9:56PM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यात आज, गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दरम्यान एका नागरिकाचा मृत्यू झाला तर एक जवान शहीद झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस प्रवक्त्यानी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी जैश- ए- मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. तर शोपियांमध्ये ३ दहशतवाद्यांना मारण्यात आले. 

पुलवामा जिल्ह्यातील देलीपोरी भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी या भागाची घेराबंदी करून शोधमोहिम सुरू केली होती. या दरम्यान एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यावेळी आर्मीचे जवान सेपॉय संदीप शहीद झाले. तसेच रायसीज दार या नागरिकाचाही मृत्यू झाला. यावेळी मारण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. नसीर पंडीथ (पुलवामा), उमर मीर (शोपियां) आणि खलीद (पाकिस्तान) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही जैश संघटनेशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियांमध्ये शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांना मारले. यावेळी एक जवान जखमी झाले.