Tue, Jan 22, 2019 08:13होमपेज › National › कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने

कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने

Published On: May 17 2018 3:10PM | Last Updated: May 17 2018 3:10PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकमध्ये भाजप नेते बीएस येडियुरप्‍पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, त्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष भाजपवर लोकशाही हत्येचा आरोप करत आहेत. यातच सर्वोच्‍च न्यायालयातील ज्येष्‍ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्‍च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी कर्नाटकमधील राज्यपालांच्या भूमिकेबाबत न्यायालयाने त्‍वरीत निकालाची कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. 

राम जेठमलानी यांनी भाजपने संविधानिक शक्‍तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज, गुरुवारी दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक प्रकरणी स्‍वतंत्रपणे बाजू मांडू देण्याची विनंती केली. यावर न्यायमूर्ती मिश्रा यांनी हे प्रकरण एके सिकरी यांच्या पीठासमोर असून याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यावर जेठमलानी शुक्रवारी तीन सदस्यीय खंडपीठासमोर आपली भूमिका न्यायालयात मांडतील.

दरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेसने निजदला पाठिंबा देत कुमारस्‍वामी यांच्या नेतृत्‍वाखाली सरकार स्‍थापण्याच्या हालचाली चालविल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजपला सत्ता स्‍थापनेसाठी पाचारण केले. यावर आज सकाळी (दि.१७) येडियुरप्‍पा यांचा तिसर्‍यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्‍हणून शपथविधी झाला. परंतु, त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी या प्रकाराला लोकशाहीची हत्या असे म्‍हटले आहे. तसेच काँग्रेसने बंगळूर विधानसौधसमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास निजद नेते देवेगौडाही उपसि्‍थत आहेत. 

Tags :Karnataka controversy, ram jethmalani, karnataka politics, supreme court, congress, BJP,