Sun, Mar 24, 2019 01:52होमपेज › National › SBIचा ग्राहकांना दिलासा; पण GSTने...

SBIचा ग्राहकांना दिलासा; पण GSTने...

Published On: Mar 13 2018 2:44PM | Last Updated: Mar 13 2018 2:51PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांनी बचत खात्यात महिन्याला किमान रक्कम न ठेवल्यास होणाऱ्या दंडात बँकेने जवळ जवळ 72 टक्क्यांनी कपात केली आहे. याचा फायदा बँकेच्या 25 कोटी ग्राहकांना होणार आहे. नवे नियम 1 एप्रिल 2018पासून लागू होणार आहेत. अनेक ग्राहकांनी केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतल्याचे बँकेने म्हटले आहे.   

कोणाला किती दिलासा मिळणार?

आतापर्यंत महानगर आणि शहरातील खातेधारकांनी महिन्याला किमान रक्कम न ठेवल्यास 50 रुपये दंड केला जात होता. एक एप्रिलपासून तो 15 रुपये इतका असेल. त्याच बरोबर निम-शहरी भागातील ग्राहकांना 40 ऐवजी 12 रुपये दंड केला जाईल. अर्थात या दंडाच्या रक्कमेसोबत 10 रुपये जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. त्यामुळे महानगर आणि शहरी भागातील ग्राहकांनी खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास त्यांना महिन्याला 25 रुपये दंड होईल.   

बचत खात्यात किती रक्कम ठेवावी लागते?

जर तुमचे खाते महानगरातील बँकेच्या शाखेत असेल तर तुमच्या खात्यात किमान 3 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. याआधी सप्टेंबर 2017पर्यंत ही रक्कम 5 हजार इतकी होती. शहरी भागातील खातेधारकांना 3 हजारच किमान रक्कम ठेवावी लागेल. तर निम-शहरी आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना अनुक्रमे 2 हजार व एक हजार किमान रक्कम खात्यात ठेवावी लागेल.  

मोठ्या प्रमाणावर झाली होती टीका

खात्यांमध्ये किमान रक्कम न ठेवल्याबद्दल बँकेने केवळ 8 महिन्यात 1 हजार 771 कोटी रक्कम दंड म्हणून वसूल केली होती. ही माहिती समोर आल्यानंतर बँकेवर सर्व बाजूंनी टीका झाली होती. कारण दंडाची रक्कम ही बँकेला जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या नफ्यापेक्षा (1 हजार 581.55 कोटी) अधिक तर एप्रिल आणि सप्टेंबर या सहा महिन्यात झालेल्या निव्वळ नफ्याच्या (3 हजार 586 कोटी) अर्धी इतकी होती.