Sun, May 31, 2020 10:43होमपेज › National › छोट्या पक्षांना वळविण्याचे प्रियांका गांधींचे प्रयत्न

छोट्या पक्षांना वळविण्याचे प्रियांका गांधींचे प्रयत्न

Published On: Mar 15 2019 1:50AM | Last Updated: Mar 15 2019 1:50AM
संजय दीक्षित 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्याच्या बाबतीत विरोधी पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील लहान लहान पक्षांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी काँग्रेस, सपा - बसपा आघाडी धडपडत आहे.

राज्यात अनेक लहान पक्ष आहेत. अपना दल, महान पार्टी, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, पीस पार्टी, निषाद पार्टी (निर्बल भारतीय शोषित हमारा अपना दल) यासह अन्य पक्षांचा समावेश आहे. यापैकी बहुसंख्य पक्षांना पूर्व उत्तर प्रदेशात जनाधार आहे. काँग्रेस महासचिवपदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रियांका गांधी-वधेरा यांनी लहान पक्षांना काँग्रेसकडे खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार त्यांनी सध्या महान दलासोबत आघाडी केली आहे. 2008 साली केशव देव मौर्य यांनी स्थापन केलेल्या महान दलास मागासवर्गीय जातींकडून, प्रामुख्याने मौर्य, कुशवाहा, सैनी आणि शाक्य यांचा पाठिंबा आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये या जातींची मते निर्णायक ठरतात. 

पीस पार्टीसोबतही काँग्रेसची चर्चा सुरू आहे. पीस पार्टीने 2014 मध्ये 51 जागांवर उमेदवार उभे करीत संत कबीर नगर, श्रावस्ती, डुमरियागंजसह अन्य मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये अस्तित्व दाखवून दिले होते. त्यामुळे पीस पार्टीसदेखील आघाडीमध्ये घेण्याचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस अथवा सपा - बसपा आघाडीसोबत पीस पार्टी जाऊ शकते, असे पक्षाचे सर्वेसर्वा मोहम्मद आयुब यांनी स्पष्ट केले आहे.

निषाद पार्टी काँग्रेस आणि सपा - बसपा आघाडीसह चर्चा करीत आहे. पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही; मात्र ते प्रियांका गांधी-वधेरा यांच्या संपर्कात आहेत. राज्यातील निषाद, केवट, बिंद, मझी, मल्लाह आणि अन्य समुदायांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा निषाद पार्टीतर्फे करण्यात येत असून गोरखपूर, कुशीनगर, चंदौली आणि भदोहीसह पूर्व उत्तर प्रदेशातील भागात पक्षाचा प्रभाव आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी सध्या भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पक्षाचे चार आमदार असून त्यात पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांचाही समावेश आहे; मात्र, गेल्या काही काळापासून ओमप्रकाश राजभर भाजपवर नाराज असून आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही ते काँग्रेसच्या संपर्कात असून लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचा जनाधार राजभर, शाक्य आणि कुशवाह समाजात असल्यामुळे त्यांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि भाजप दोन्हीही करीत आहेत.

भाजपसोबत युतीमध्ये असलेल्या अपना दलाच्या अनुप्रिया पटेलदेखील प्रियांका गांधी-वधेरा यांच्या सतत संपर्कात आहेत. भाजपसोबतच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या गोटात जाण्याची तयारी अनुप्रिया पटेल करीत आहेत. प्रियांकांसोबत त्यांचे सूर कसे जुळतात आणि जागावाटपाचा प्रश्‍न कसा सोडविणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांना काँग्रेसच्या गोटात सामील करीत भाजपच्या गडाला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश आले आहे. मागील काही काळापासून नाराज असणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या साथीने पूर्व उत्तर प्रदेशात दलित समुदायाची मतपेढी काबीज करण्याचा काँग्रेसला विश्‍वास वाटत आहे.

काँग्रेसने लोकसभेच्या 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत सपा-बसपा आघाडीवर दबाव वाढविला आहे. पहिल्या यादीत असलेले सर्व उमेदवार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. असे असले तरी सपा-बसपा आघाडीत काँग्रेसच्या समावेशाविषयीच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सपा-बसपा आघाडीत सहभागी होण्याची शक्यता अद्यापही असून काँग्रेससोबत सपा-बसपा नेतृत्वाच्या पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व चर्चांचा परिणाम काय होणार, हे तर भविष्यात कळेल. मात्र, उत्तर प्रदेशात भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.