Mon, Jun 17, 2019 11:10होमपेज › National › विरोधकांना हवे  ‘मजबूर’ सरकार

विरोधकांना हवे  ‘मजबूर’ सरकार

Published On: Jan 13 2019 1:43AM | Last Updated: Jan 13 2019 12:30AM
नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध महाआघाडीच्या रूपात एकवटलेल्या विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली. सुमारे 80 मिनिटे केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.  माझ्या एकट्याविरुद्ध आघाडी बनवून विरोधकांना भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांत बुडालेले ‘मजबूर’ सरकार बनवायचे आहे. मात्र, देशाला सामर्थ्यवान बनविणारे ‘मजबूत’ सरकार हवे आहे, असे उद‍्गार त्यांनी शनिवारी काढले.

मोदी म्हणाले की, ज्या पक्षांचा जन्म काँग्रेस आणि काँग्रेसच्या संस्कृतीविरोधात झाला, तेच पक्ष आज काँग्रेससमोर लोटांगण घालत आहेत. हे सर्व पक्ष ‘मजबूर’ सरकार यावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना आपला भ्रष्टाचार सुरूच ठेवायचा आहे, संरक्षण करारात दलाली करायची आहे, कॉमनवेल्थ, टू-जीसारखे घोटाळे करायचे आहेत. त्याउलट भाजपला ‘मजबूत’ सरकार आणायचे आहे. देशहितासाठी काम करणारे, विकासाचे राजकारण करणारे सरकार आणायचे आहे.  नॅशनल हेरॉल्डप्रकरणी जामिनावर असलेले राहुल आणि सोनिया गांधी हे स्वतःला देश आणि संवैधानिक संस्थांपेक्षाही मोठे समजतात. सर्जिकल स्ट्राईकचा अपमान करणारे, 1984 च्या दंगलीतील आरोपींना वाचविणारे, मतांसाठी देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड करणारे देश सक्षमपणे चालवू शकत नाहीत. त्यांचा विश्‍वास ‘सल्तनत’वर आहे आणि आमचा विश्‍वास ‘संविधानावर’आहे, असे सांगत मोदी यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा देशासमोर मांडला. त्याचवेळी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचा फोलपणा दाखवित देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी, असे आवाहन केले.
माँसाहेब जिजाऊ सुराज्य घडविण्याचा आशीर्वाद देणार : पंतप्रधान म्हणाले की, आज 12 जानेवारी, म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्रोत जिजाऊ माँसाहेबांची जयंती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली. आज त्यांच्या जयंतीदिनी त्या आपल्यालादेखील सुराज्य घडविण्याचा आशीर्वाद देत आहेत, अशी मला खात्री आहे. माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे सुराज्य घडविण्यासाठी आपण मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतास विश्‍वगुरूपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करणे, हीदेखील आपली जबाबदारी आहे.

लोक स्वेच्छेने सबसिडी सोडत आहेत : मोदी म्हणाले की, सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर देशाची स्थिती वेगळी राहिली असती. त्याचप्रमाणे जर 2004 साली अटलजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असते, तर आतापर्यंत देशाने फार मोठी प्रगती  केली असती. आत्मविश्‍वास गमावलेल्या जनतेस 2014 साली भाजपने बाहेर काढले. देशातील जनता गॅस सबसिडी, रेल्वे सवलती स्वेच्छेने सोडत आहे, प्रामाणिकपणे कर भरत आहे. कारण आपला पैसा हा देशहितासाठीच वापरला जात असल्याचा विश्‍वास जनतेत निर्माण झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या नार्‍यावर चालणारे आमचे सरकार आहे. 

आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षणाने आत्मविश्‍वास वाढेल : आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गास 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा देशातील युवावर्गाचा आत्मविश्‍वास वाढविणारा ठरला असल्याचे मोदी म्हणाले. अन्य समाजास दिलेले आरक्षण हिरावून न घेता हे आरक्षण सरकारने दिले आहे. आगामी काळात शिक्षणात 10 टक्के जागाही वाढविणार असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षणाची व्यवस्था यापुढेही कायम राहील, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही  आरोप नाही : पंतप्रधान मोदी

साडेचार वर्षांत आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नसल्याचे सांगत मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार न करता देशाचा कारभार करता येतो, हे साडेचार वर्षांत सिद्ध झाले आहे. देशहितासाठी घ्यावयाच्या कठोर निर्णयांना जनता साथ देते, व्यवस्थेत दडलेल्या दलालांना बाहेर काढता येते, हे सिद्ध झाले. युवावर्गासाठी सर्व क्षेत्रात संधी निर्माण केल्या. त्यामुळे भारतीय युवा आज जगभरात यशस्वी होत आहे. महिलांसाठी दूरगामी धोरणे आखण्यात आली आहेत, मातृत्वरजेच्या कालावधीत वाढ, सैन्यदलात महिलांचा सहभाग, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारख्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

मला सलग 12 वर्षे त्रास दिला...

मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना खोट्या प्रकरणात मला आणि अमित शहा यांना गोवण्याचा प्रयत्न काँग्रेसने पुरेपूर केला. सर्व तपासयंत्रणा पाठीशी लावल्या होत्या. मी मुख्यमंत्री असूनही तब्बल नऊ तास एसआयटी चौकशीस तोंड दिले, असे मोदी यांनी सांगितले.

देशाचा सेवक कसा हवा?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले, आपल्या घरासाठी सेवक ठेवायचा असल्यास चोरी करणारा, घरातील गोष्टी बाहेर सांगणारा, कामाच्या वेळी दोन-तीन महिने सुट्टीवर जाणारा सेवक तुम्ही कधीही ठेवणार नाही. त्याचप्रमाणे देशासाठीदेखील असा सेवक कामाचा नाही.