Wed, Jun 03, 2020 18:26होमपेज › National › मोदी वेबसीरिजवरही बंदी

मोदी वेबसीरिजवरही बंदी

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 20 2019 11:12PM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

केंद्रीय निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिजवरही बंदी घातली आहे. मोदी यांच्या बायोपिकसह ‘नमो टीव्ही’वरील राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातल्यानंतर आयोगाने आचारसंहितेच्या मुद्द्यावरून ‘इरॉस नाऊ’ला वेबसीरिज थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘इरॉस नाऊ’वर ‘मोदी-जर्नी ऑफ कॉमन मॅन’ ही मोदींच्या जीवनावरील वेबसीरिज सुरू असून, या सीरिजच्या सर्व भागांचे प्रसारण तत्काळ थांबवण्यात यावे, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने ‘इरॉस नाऊ’ला दिले. मोदींवरील वेबसीरिजचे पाच भाग ‘इरॉस नाऊ’वर उपलब्ध असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. या सीरिजशी संबंधित सर्व प्रकारचा कंटेंट पुढील आदेशापर्यंत हटवण्यात यावा, असेही आयोगाने या आदेशात नमूद केले आहे.  नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून, ते लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकीय व्यक्‍तींचे आत्मचरित्र अथवा चरित्र यांचे प्रसारण करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार्‍या राजकीय कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे निर्देश आयोगाने 10 एप्रिल रोजी दिले होते. आयोगाच्या निर्देशानंतर मोदींच्या जीवनावरील चित्रपटासह ‘नमो टीव्ही’वरील राजकीय कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली.