Sat, Jun 06, 2020 13:59होमपेज › National › 'तृणमूल'च्या गुंडांनी प. बंगालचा नरक केला- मोदी

'तृणमूल'च्या गुंडांनी प. बंगालचा नरक केला- मोदी

Published On: May 16 2019 6:44PM | Last Updated: May 16 2019 6:44PM
मथुरापूर (प. बंगाल) : पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालमधील मथुरापूर येथील सभेत आज संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, गेल्या ३-४ दिवसांपासून येथे जे होत आहे; ते तुम्ही पहात आहात. तृणमूलच्या गुंडांनी येथे जो नरक बनविला आहे; ज्या प्रकारे येथे हिंसाचार वाढत आहे त्यामुळे लोकशाही बदनाम झाली आहे. तृणमूलच्या गुंडांनी महान समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला. यावरून स्पष्ट दिसते की व्होटबँकच्या राजकारणासाठी दीदी कोणत्याही थराला जाऊ शकते.

ते पुढे म्हणाले की, त्या महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. सरकारला नारदा- शारदा घोटाळ्याच्या पुराव्याप्रमाणे या घटनेचे पुरावेही नष्ट करण्याची काय गरज आहे. आज ईश्वरचंद्र जेथे असतील तेथे पहात असतील की कोणता पक्ष बंगालच्या गौरवाची सुरक्षा करण्यासाठी लढत आहे आणि कोण घुसखोरांची सुरक्षा करत आहे. बंगालच्या गौरवाची सुरक्षा करणे याला भाजप नेहमी प्राधान्य देत आहे.  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री भारताच्या पंतप्रधानांना आपले मानत नाही. मात्र त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक करतात. त्यांना राज्याला विकासाला स्पीड ब्रेकर लावला आहे. त्यांना पश्चिम बंगालमधील सामान्य लोकांची चिंता नाही. त्यांना केवळ सत्तेचा अहंकार आहे, अशा शब्दांत मोदींनी ममतांवर हल्लाबोल केला.

कोलकाता येथील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जाण्यापूर्वी म्हटले होते की,  आज पुन्हा एकदा माझी पश्चिम बंगालमध्ये सभा आहे. आता पाहू की ममता दीदी माझी सभा होऊ देतात की नाही. अशा प्रकारे बोलून मोदी यांनी ममतांना एकप्रकारे आव्हान दिले होते.