Fri, Feb 22, 2019 01:31होमपेज › National › प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; सीआयएसएफ अधिकाऱ्याने वाचविले प्राण

प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; सीआयएसएफ अधिकाऱ्याने वाचविले प्राण

Published On: Feb 12 2019 9:07PM | Last Updated: Feb 12 2019 9:07PM
वाराणसी : पुढारी ऑनलाईन

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. जेव्हा हृदयाची धडधड थांबते तेव्हा ‘सीपीआर’ (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) अर्थात कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देणे आवश्यक असते. याच प्रणालीचा वाराणसी विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका अधिकाऱ्याने सतर्कतेने वापर करून मुंबईतील प्रवाशाचे प्राण वाचविले आहेत.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सिंह (वय ४८) यांना वाराणसी विमानतळावर हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी तेथे ड्युटीवर असलेले सीआयएसएफचे निरीक्षक नीरज कुमार हे त्यांच्या मदतीला धावले. कुमार यांनी वेळ न घालवता मनोज सिंह यांना कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन अर्थात कृत्रिम श्‍वासोच्छ्वास दिला. ‘सीपीआर’ जीवनरक्षक प्रणालीचा वापर केल्याने त्यांच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होऊन त्यांचे प्राण वाचले. लगेच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

देशातील ६० नागरी विमानतळांवर सीआयएसएफची सुरक्षा तैनात आहे. सीआयएसएफ जवानांना ‘सीपीआर’ जीवनरक्षक प्रणालीच्या वापराबाबत तसेच अन्य वैद्यकीय प्रणालीबाबत प्रशिक्षण दिले आहे. यामुळे वाराणसी विमानतळावर एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.