Sat, Aug 24, 2019 10:34होमपेज › National › ट्विटरची टीम हजेरीसाठी संसदेत, पण....

ट्विटरची टीम हजेरीसाठी संसदेत, पण....

Published On: Feb 11 2019 5:38PM | Last Updated: Feb 11 2019 5:38PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडिया माध्यम असलेल्या ट्विटरचे पथक चौकशीसाठी संसदेच्या समितीसमोर सोमवारी (दि.११) हजर राहण्यासाठी संसदेत दाखल झाले. मात्र, जोपर्यंत ट्विटरचे सीईओ अथवा कोणीही वरिष्ठ अधिकारी समितीसमोर हजर होत नाही, तोपर्यंत ट्विटरच्या कोणत्याही अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार नाही, असा ठराव माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संसदीय समितीने घेतला आहे. ट्विटरच्या सीईओंना हजर राहण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

सोशल मीडियामधील मातब्बर असलेल्या ट्विटरला चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, तत्काळ हजर राहण्यास ट्विटरने नकार दिला होता. मात्र, ट्विटरच्या अधिकाऱ्यांचे पथक चौकशीसाठी संसदेत दाखल झाले. यात ट्विटरच्या भारतातील प्रतिनिधींचा समावेश आहे.

वाचा : ट्विटर 'सीईओं'चा संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास नकार

सोशल मीडिया व्यासपीठावर नागरिकांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी १ फेब्रुवारीला अधिकृत पत्र पाठवून समन्स बजावले होते. संसदीय समितीची बैठक ७ फेब्रुवारीला अपेक्षित होती, पण ही बैठक आज होणार होती. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉरसे आणि वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आजही ही बैठक झाली नाही.

आयटी विभागाच्या संसदीय समितीने १ फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, टि्टरच्या मुख्य अधिकाऱ्यांना समितीसमोर उपस्थित राहावे लागेल. संसदेत उपस्थित राहण्यासाठी केवळ १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे आणि नोटीसचा कालावधी सुद्धा कमी आहे असे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले.