Sun, May 31, 2020 14:45होमपेज › National › पीपीई किट चीनहून भारतात दाखल

पीपीई किट चीनहून भारतात दाखल

Last Updated: Apr 07 2020 11:21PM
नवी दिल्ली ः राहुल पारचा

कोरोना विरुद्धच्या लढाईत एक दिलासा देणारी बातमी आहे. भारताने चीनकडून वैद्यकीय उपकरणे स्वीकारली असून 4 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या मदतीने 21 टन वैद्यकीय साहित्याची पहिली खेेप भारतात दाखल झाली आहे. यात व्हेंटिलेटर, पीपीई किट यांचा समावेश आहे. चीनने पहिल्या टप्प्यात 1 कोटी 70 लाख पीपीई किट दिले आहेत. 

दरम्यान, 20 हजार पीपीई किट देशातच तयार केले गेले आहेत. म्हणजेच एकूण 1 कोटी 90 लाख पीपीई किट तयार असून ते दवाखान्यांत पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. देशात 3,87,473 पीपीई किट आधीपासूनच उपलब्ध होते. विशेष म्हणजे, चीनहून आणखी 60 लाख पीपीई किट भारतात पाठवण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हा करार झाला, तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठी मदत होणार आहे. 

सिंगापूरहून 11 एप्रिल  रोजी पोहोचणार किट

चीनसह भारताने सिंगापूरकडूनही मदत मागितली होती. मास्कसह 80 लाख पीपीई किटची ऑर्डर सिंगापूरला दिली होती. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 80 लाख किट 11 एप्रिलपासून मिळतील. पहिल्या टप्प्यात 2 लाख त्यानंतर एका आठवड्यात 8 लाख किट सिंगापूरहून मिळतील. शिवाय 11.76 लाख एन 95 मास्कची ऑर्डर दिली आहे. 80 लाख पीपीई किटसोबत मास्कही आहेत. अशाप्रकारे मास्कची संख्याही वाढवली गेली आहे. प्रत्येक आठवड्यात 10 लाख पीपीई किट मिळण्याचे लक्ष्य आहे.

भारतात दररोज 80 हजार मास्कनिर्मितीचे लक्ष्य 

भारतात सध्या पीपीई किट उत्तर रेल्वे विभागाकडून बनवली जात आहेत. डीआरडीओनेही मास्क आणि किट बनवली आहेत. उत्पादन आता वाढवले जात आहे. सरकारकडून दररोज 80 हजार मास्क बनविण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.  

20 लाखांहून अधिक एन 95 मास्कचे वाटप 

केंद्र सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 20 लाखांहून अधिक एन 95 मास्कचे वाटप केले गेले आहे. यात 16 लाख मास्क रुग्णालयांशिवाय देशातील विविध भागांत गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत, तर 6 लाख पीपीई किटचा पुरवठाही केला गेला आहे. 

विमानातून 161 टन साहित्य पोहोचवले

वैद्यकीय साहित्याची ने-आण करण्यासाठी विमानात अधिक जागेची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे नागरी हवाई उड्डयन महानिदेशालयाने (डीजीसीए) प्रवासी कंपार्टमेंटमध्येही साहित्य नेण्याची परवानगी दिली आहे. डीजीसीएच्या माहितीनुसार 4 एप्रिलपर्यंत 116 कार्गो उड्डाणांद्वारे 161 टन वैद्यकीय साहित्य देशभरात पोहोचवले गेले आहे.