Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › National › विरोधकांकडून पंतप्रधान मोदी लक्ष्य 

विरोधकांकडून पंतप्रधान मोदी लक्ष्य 

Published On: Feb 12 2019 1:13AM | Last Updated: Feb 11 2019 11:45PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा/वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यास सुरुवात झाली आहे. आज दिल्लीत आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा यासाठी आंध्र प्रदेश भवन बाहेर उपोषणाला बसलेल्या आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंसह त्यांना उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिलेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले; तर समाजवादी पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस, आप या पक्षांनीही नायडूंना पाठिंबा दिला आहे.

आंध्र प्रदेशचा अपमान सहन केला जाणार नाही : चंद्राबाबू

आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा द्यावा आणि आंध्र प्रदेश राज्य निर्मिती कायदा 2014 अंतर्गत केंद्र सरकारने देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करावी, या मागणीसाठी तेलगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीतील आंध्र भवनसमोर लाक्षणिक उपोषण केले. उपोषणस्थळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते अहमद पटेल, आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत नायडू यांना पाठिंबा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताहून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. 

मागण्या पूर्ण न केल्यास त्या कशा पूर्ण करून घ्यायच्या, ते आम्हाला चांगलेच माहीत आहे. आमच्या आत्मसन्मानावर हल्ला केल्यास ते सहन केले जाणार नाही, पंतप्रधान मोदी यांनी वैयक्‍तिक हल्ले करणे ताबडतोब थांबवावे, अन्यथा चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी दिला.

नायडू यांनी सकाळी राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी आदरांजली अर्पण केली. यावेळी नायडू म्हणाले की, पंतप्रधान मोदी अतिशय अहंकारी आहेत. काही पक्षांसमवेत युती करून निवडणुकीत विजय मिळविण्याचा ते विचार करीत असले तरी, देशाचे नेतृत्व करण्यास ते सक्षम नाहीत. शासनाने जनतेच्या आशा-आकांक्षांचा विचार करणे आवश्यक असते, मी आंध्र प्रदेशच्या पाच कोटी लोकांसाठी लढत आहे. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या बाबतीत राजधर्माचे पालन केले नाही, आंध्र प्रदेशास अद्यापही विशेष राज्याचा दर्जा दिलेला नाही. आम्ही न्याय्य हक्कांसाठी लढत आहोत, असेही नायडू यांनी सांगितले.

शिवसेनेचाही पाठिंबा 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपोषणस्थळी भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही दोन्ही पक्षांमध्ये अजूनही युतीबाबत बोलणी न झाल्याने संभ्रमावस्था असतानाच राऊत यांनी नायडू यांच्या व्यासपीठावर जाऊन यात आणखी भर पाडली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, शरद यादव आदींसह विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नायडू यांची भेट घेतली.