होमपेज › National › दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदी म्हणाले...

दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदी म्हणाले...

Last Updated: Feb 26 2020 5:24PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा

दिल्लीतील हिंसाचाराने कळस गाठला असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना शांतता व एकतेचे आवाहन केले आहे. ईशान्य दिल्लीतील मोठा भाग हिंसाचाराने होरपळून निघाला असून, एका पोलिस कर्मचाऱ्यासह गुप्तचर खात्यातील एक कर्मचारी यात मृत्यूमुखी पडला आहे. मृतांची एकूण संख्या वीसच्या वर गेली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाग्रस्त भागात लष्कर पाचारण करण्याची मागणी केली आहे.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील स्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलिस व इतर यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावे आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावे, असेही मोदी यांनी संदेशात म्हटले आहे. 

अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी...

दरम्यान, दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात सीडब्ल्यूसीच्या आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आगपाखड केली. परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गांधी यांनी केली.

दिल्लीतील हिंसाचार हे एक विचारपूर्वक रचण्यात आलेले षड्यंत्र असल्याचा आरोप गांधी यांनी केला. दिल्ली पोलिस 72 तासांपासून निष्क्रिय आहेत आणि 20 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे सांगून गांधी पुढे म्हणाल्या की, भाजपच्या काही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन घृणा आणि भयाचे वातावरण तयार केले. दिल्लीतील विद्यमान स्थितीसाठी केंद्र सरकार आणि विशेषतः गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांचे नाव न घेता त्यांच्यावरही गांधी यांनी टीका केली.

दिल्ली सरकार आपली भूमिका बजावण्यात अपयशी ठरल्याचा आरोप गांधी यांनी केला. शांतता प्रस्थापित करण्यात दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना अपयश आले. स्थिती गंभीर असून, तात्काळ कारवाईची गरज असल्याचे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे. हिंसा प्रभावित विभागात मुख्यमंत्र्यांनी जाऊन लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.

लष्कराला पाचारण करण्याची केजरीवाल यांची मागणी...

हिंसाचारग्रस्त भागात लष्कराला पाचारण केले जावे, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती गंभीर असून, सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळालेले नाही, असे केजरीवाल म्हणाले. लष्कर पाचारण करण्याच्या अनुषंगाने आपण लवकरच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहोत, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, रात्रभर आपण असंख्य लोकांच्या संपर्कात होतो, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना यश आलेले नाही. अशा स्थितीत लष्कर पाचारण करणे आवश्यक असल्याचे आपले मत आहे. 

डोवाल यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक....

दिल्लीतील परिस्थितीवर विचारविमर्श करण्यासाठी आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर डोवाल यांनी जाफराबाद, सीलमपूर आदी भागाचा दौरा केला.