Sun, Oct 20, 2019 06:29होमपेज › National › आधारशिवाय पॅनकार्ड अवैध

आधारशिवाय पॅनकार्ड अवैध

Published On: Jul 12 2019 1:41AM | Last Updated: Jul 11 2019 11:32PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आधारशी जोडणी (लिंक) न केलेले पॅनकार्ड 1 सप्टेंबरपासून अवैध ठरविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातील (सीबीडीटी) उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. पॅनकार्ड वैध राहण्यासाठी नागरिकांना पॅन क्रमांक आधार क्रमांकाला लिंक करावा लागणार आहे. ज्यांनी केवळ आधार क्रमांकाच्या आधारे विवरणपत्र भरले आहे, त्यांना 1 सप्टेंबरनंतर नव्याने पॅन क्रमांक दिला जाणार आहे. करदात्यांना हा पॅन क्रमांक डाऊनलोड करून घ्यावा लागेल. सध्या देशात 40 कोटी लोकांकडे पॅनकार्ड आहेत. मात्र, यातील 18 कोटी लोकांनी पॅन क्रमांक आधारशी लिंक केलेला नाही. 22 कोटी लोकांनी पॅन-आधार जोडणी केली आहे. विवरणपत्र भरण्यासाठी आणि मोठ्या व्यवहारांसाठी व्यक्तीची ओळख महत्त्वाची असते. त्यामुळे आम्ही पॅन किंवा आधार यापैकी एक पर्याय उपलब्ध ठेवला आहे.

ज्यांनी पॅन क्रमांक लिंक केलेला नाही, अशा लोकांचे पॅन क्रमांक 1 सप्टेंबरनंतर पहिल्या टप्प्यात रद्द केले जातील. ज्यांनी केवळ आधारद्वारे विवरणपत्र भरले आहे, अशा करदात्यांना आयकर विभाग स्वतःहून नव्याने पॅन क्रमांक देणार आहे. संबंधित करदात्यांना हा नवा क्रमांक डाऊनलोड करावा लागेल. नवा पॅन क्रमांक भविष्यात मोठ्या व्यवहारांसाठी नागरिकांना वापरता येईल. ‘सीबीडीटी’च्या वतीने गेल्यावर्षी मार्च महिन्यात पॅन-आधार लिंकिंगसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानेही आधार-पॅन लिंकिंग अनिवार्य केले आहे.