Wed, Jun 19, 2019 08:57होमपेज › National › प्रसुतीवेळी बाळाचे डोके राहिले गर्भाशयात

प्रसुतीवेळी बाळाचे डोके राहिले गर्भाशयात

Published On: Jan 11 2019 4:30PM | Last Updated: Jan 11 2019 4:36PM
जैसलमेर (राजस्थान) : पुढारी ऑनलाईन 

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील रामगड येथील एका सरकारी आरोग्य केंद्रातील नर्सच्या निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आला आहे. हा धक्कादायक प्रकार वाचवल्यावर अंगावर शहारे उभे राहतात. रामगड येथील सरकारी आरोग्य केंद्रात एका महिलेची प्रसूती करताना पुरुष नर्संने बाळाला जोरात ओढले. यामुळे बाळाचे डोके गर्भातच राहिले आणि बाळाच्या शरिराचा डोक्याखालील भाग हातात आला. या प्रकारानंतर महिलेस तातडीने उपचारासाठी जोधपूर येथे हलविले, त्यानंतर बाळाचे  डाके बाहेर काढण्यात आले. 

या महिलेचे नाव दीक्षा कंवर आहे. या महिलेस प्रसुतीसाठी रामगडच्या सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर या महिलेस उपचारासाठी जैसलमेर येथे पाठवण्यात आले. यावेळी रामगड आरोग्य केंद्रातील नर्सकडून जैसलमेरच्या जवाहर आरोग्य केंद्रातील डॉ. सांखला यांना सांगण्यात आले की, दीक्षा कंवर यांची प्रसूती झाली आहे. मात्र काही भाग पोटातच राहिला आहे.

डॉ. संकाला यांनी गर्भाचा वरचा भाग काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना शक्य झाले नाही. यानंतर दीक्षा यांना त्यांचे नातेवाईक जोधपुरमधील उमेद आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेले. 

जोधपुरमधील उमेद आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्याकडून दीक्षाची प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दीक्षाच्या शरीरातून गर्भाचा अर्धवट भाग म्‍हणजे बाळाचे डोके बाहेर काढण्यात आले. त्यावेळी दीक्षाच्या नातेवाईकांनाच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. यानंतर दीक्षाचे नातेवाईक गर्भाचा अर्धवट भाग घेऊन रामगड पोलिस ठाण्यात पोहचले. दीक्षाची तब्येत नाजूक आहे. उमेद आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.