Wed, Jun 03, 2020 09:04होमपेज › National › नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Last Updated: Oct 22 2019 1:06PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आलेल्या अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बॅनर्जी यांच्यासोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले.

भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिकस दृष्टीकोन या विषयावरील संशोधनासाठी बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पत्नी एस्तेर डफ्लो आणि सहकारी मायकेल क्रेमर यांनादेखील गौरविण्यात आले आहे.

अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी भेटीचे छायाचित्र ट्वीट करीत त्याविषयी माहिती दिली. नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत अतिशय चांगली भेट झाली. मानवी सक्षमीकरणाबद्दलची त्यांची कळकळ स्पष्टपणे जाणवते. विविध विषयांवर आमची अगदी सकारात्मक चर्चा झाली. संपूर्ण देशास त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. त्यांच्या भावी प्रवासासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

पंतप्रधानांसमवेतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करीत बॅनर्जी म्हणाले की, पंतप्रधानांची भेट घेणे हा अतिशय चांगला अनुभव होता, त्यांनी मला बराच वेळ दिला. नोकशाहीला अधिक लोकाभिमुख बनविण्याचे आपले प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. समाजात पायाभूत बदल घडविणारी नोकरशाही निर्माण करण्यास प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी असलेले त्यांचे विचार आणि प्रयत्न याविषयीदेखील त्यांनी माहिती दिली.

नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था संकटात असल्याचे विधान बॅनर्जी यांनी केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बॅनर्जी यांची पाठराखण केली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीस विशेष महत्व प्राप्त होते.