Wed, Jun 03, 2020 04:55होमपेज › National › निवडणूक आयोगाचा दणका; हिंसाचार प्रकरणी प. बंगालमध्ये २० तास आधी प्रचारबंदी

निवडणूक आयोगाचा दणका; हिंसाचार प्रकरणी प. बंगालमध्ये २० तास आधी प्रचारबंदी

Published On: May 15 2019 8:23PM | Last Updated: May 15 2019 8:58PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोलकाता येथे काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली. पश्चिम बंगालमधील ९ लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री १० वाजल्यापासून प्रचारावर बंदी घातली आहे. भारतातील निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच २० तास आधी प्रचार थांबविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला.

निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, पहिल्यांदाच निवडणूक काळात घटनेच्या अधिकाराचा वापर करून कारवाई करावी लागली. 

लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. या अंतिम टप्प्यातील प्रचार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपणार होता. मात्र, त्यापूर्वीच २० तास आधी प्रचारावर बंदी घातली आहे. तसेच निवडणूक आयोगाने एडीजी (सीआयडी) राजीव कुमार आणि राज्याचे प्रधान सचिव (गृह) अत्री भट्टाचार्य यांना पदावरून हटविण्याचा आदेश जारी केला.

कोलकाता येथे ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीची घटना दुर्देवी असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने कलम ३२४ लागू केले. निवडणुकी दरम्यान पुन्हा हिंसाचाराच्या घटना पुन्हा घडल्यास आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा पहिल्यांदाच वापर केला असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. 

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत ज्या घटना घडल्या आणि याबाबत राजकीय पक्षांकडून आलेल्या तक्रारी तसेच पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाच्या अहवालाच्या आधारानुसार स्वतंत्र, मोकळ्या, पारदर्शक आणि हिंसामुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी कोणीही सार्वजनिक सभा घेऊ शकत नाही. गुरुवारी रात्री १० वाजल्यानंतर कोणीही प्रचार करू शकत नाही. हा आदेश पश्चिम बंगाल ९ मतदारसंघासाठी लागू आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये काल, अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. रोड शो दरम्यान अमित शहा उभा असलेल्या ट्रकवर काठ्या फेकल्या आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. त्यानंतर जाळपोळीचे प्रकारही घडले. या दरम्यान भाजप, डाव्यांची विद्यार्थी संघटना आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे कार्येकर्ते एकमेकांना भिडले. पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्येही झटापट झाली. या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.