Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › नेपाळने चीनसोबतचा प्रकल्प रद्द केला; भारतीय कंपनीला मिळणार संधी?

नेपाळचा चीनला झटका; वीज प्रकल्प केला रद्द!

Published On: Nov 15 2017 10:56AM | Last Updated: Nov 15 2017 2:24PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली/ बिजिंग: पुढारी ऑनलाईन

नेपाळला स्वत:च्या बाजूने घेण्याच्या चीनच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. नेपाळमधील बुधी गंडाकी नदीवरील हायड्रोइलेक्टिक प्रोजेक्ट येथील सरकारने रद्द केला आहे. नेपाळच्या या निर्णयामुळे आशिया खंडातील चीनच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प चीनमधील एक कंपनीला देण्यात आला होता.  यासंदर्भात अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम भारताच्या नॅशनल हायड्रोइलेक्टिक पॉवर कार्पोरेशन (एनएचपीसी)ला मिळण्याची शक्यता आहे.

बुधी गंडाकी नदीवरील हायड्रोइलेक्टिक प्रोजेक्टचे काम चीनच्या गेचोउबा ग्रुपला देण्यात आले होते. संसदीय समितीने दिलेल्या आदेशानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी करण्यात आलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी सांगितले.   

नेपाळने घेतलेल्या या निर्णयावर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सावध प्रतिक्रिया दिली आहे. करार रद्द केल्यासंदर्भात अधिक तपशील माहित नाही. मात्र  चीन आणि नेपाळचे संबंध चांगले असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

याआधी म्यानमारने 2011मध्ये चीनसोबतचा 3.6 बिलियन अमेरिकन डॉलर्स किमतीचा धरण बांधण्याचा प्रकल्प रद्द केला होता. यासंदर्भात आमची म्यानमार सोबत चर्चा सुरू असल्याचे चीनने गेल्याच आठवड्यात म्हटले होते.