Sat, Sep 21, 2019 06:57होमपेज › National › ...तर मोदी-शहा यांनी साध्वी प्रज्ञांच्या पराभवासाठीच प्रार्थना करावी.

नरेंद्र मोदी राजधर्म पाळणार काय?

Published On: May 19 2019 4:04PM | Last Updated: May 19 2019 4:04PM
शंकर पवार

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून आता निकालाचे वेध लागले आहेत. पुन्हा मैदान मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने प्रचारात कोणतीही कसूर सोडली नाही. स्वत: मोदींनी देशभरात १४२ ठिकाणी सभा घेतल्या. भाजपचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या सर्व नीतींचा वापर केला. सर्व परिस्थिती आपल्या शैलीत हाताळणाऱ्या आणि कोणत्याही मुद्द्यावर सहजासहजी माघार घेणे टाळणाऱ्या मोदी-शहा जोडीला या निवडणुकीतील एक निर्णय मात्र चांगलाच महागात पडल्याची चिन्हे आहेत. 

दिग्गींच्या विरोधात कट्टर हिंदूत्ववादी चेहरा

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून बालाकोटची कारवाई, राष्ट्रवाद, देशभक्ती आदी मुद्द्यांवरून भाजपने प्रचारात आघाडी घेतली. जुनेच मुद्दे काढून मोदी-शहांचे काँग्रेसला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' च्या घोषणेलाही भाजपने 'मैं भी चौकीदार' म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना रोखण्यासाठी भाजपने टाकलेला डाव पुरता अंगाशी आल्याचे दिसत आहे. हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करून फसलेल्या दिग्गीराजांच्या विरोधात भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा देण्याला पसंती दिली. त्यासाठी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली. तेव्हापासूनच विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली होती. परंतु, स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

मोदींकडून साध्वींच्या उमेदवारीचे समर्थन

गेल्या ५ हजार वर्षांपासून जगात ज्या महान संस्कृती आणि परंपरेने 'वसुधैव कुटुम्बकम्', 'सर्वे भवन्तु सुखिन:' हा संदेश दिला. तसेच 'एकम् सद् विप्रा: बहुधा वदन्ति'चा संदेश ज्या संस्कृतीने दिला. तुम्ही त्या संस्कृतीला दहशतवाद ठरवून मोकळे झालात. प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी या सर्वांना उत्तर देण्यासाठी देणे हे एक प्रतिक असून काँग्रेसला हे आरोप महागात पडणार असल्याचे मोदींनी म्हटले. परंतु, त्याच साध्वी प्रज्ञासिंह यांच्यामुळे मोदी आणि भाजप पुरती गोत्यात येताना दिसत आहे. 

साध्वी प्रज्ञांचे बिगडे बोल

साध्वी प्रज्ञासिंह सुरुवातीलाच मुंबई हल्ल्यातील शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर घसरल्या. माझ्या शापाने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे विधान वादग्रस्त ठरले. यावर देशभरातून नाराजीचे सूर उमटले. भाजपलाही या प्रकरणातून अंग काढून घेणे भाग पडले. तसेच ते त्यांचे वैयक्तीक मत असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे सांगण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. तेव्हाच पक्षाने 'मौन' स्वीकारण्याची जणू तंबीच दिली. त्यामुळे काही काळ त्या शांत राहिल्या. पण कायम शांत राहतील त्या साध्वी कसल्या. त्यांनी वादग्रस्त वक्यव्यांचा जणू सपाटाच लावला. पुढे त्यांना आपण बाबरी मशीद पाडण्यात सहभागी असल्याचेही आठवले. त्यामुळे बाबरी विध्वंसापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला पुन्हा विरोधकांच्या टीकेचे प्रहार सहन करावे लागले. 

प्रज्ञासिंह यांची 'नथुरामभक्ती'

या सर्वांवर कळस झाला तो त्यांच्या नथुरामभक्तीमुळे. दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य केले आणि साध्वींचा तोल पुन्हा ढळला. त्यांच्यातील नथुराम प्रेम जागे झाले आणि नथुराम गोडसेला देशभक्तीचे सर्टिफिकेट देऊन त्या रिकाम्या झाल्या. पुढे पक्षादेश मानत त्यांना या प्रकरणी माफी मागावी लागली. मात्र, एकदा गेलेला शब्द परत येत नसतो आणि ही तर जाणीवपूर्वक केलेले चूक आहे. त्यामुळे देशातील जनता आपल्या राष्ट्रपित्याचा असा अपमान कधीही सहन करणार नाही.

"नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील," या साध्वींच्या वक्तव्यामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून भाजपला घेरले जाऊ लागले. त्यामुळे महात्मा गांधींचा वारसा जगभरात अभिमानाने मिरवणाऱ्या पंतप्रधान मोदींची पक्षातीलच या 'गोडसेभक्ती'मुळे अडचण झाली. मोदींनी आपल्या कार्यकाळात महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी केली, अगदी चंपारण्य, साबरमतीत कार्यक्रम घेतले, चरख्यावर बसून सूत कातले, स्वच्छ भारतच्या लोगोवर महात्मा गांधींचा चष्मा वापरला. अशा कित्येक कार्यक्रमात गांधी विचारांचा वारसा सांगणाऱ्या मोदींना स्वपक्षातूनच होत असणाऱ्या गांधीद्वेषामुळे नामुष्की स्वीकारावी लागली. 

साध्वींना हृदयातून माफ करणार नाही : मोदी

प्रज्ञा आणि अन्य लोक जे नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्याविषयी वक्तव्य करत आहेत. ते अत्यंत्य वाईट आहे. भलेही प्रज्ञाने माफी मागितली आहे, मात्र मी त्यांना मनापासून माफ करणार नाही. सभ्य समाजात अशी वक्तव्ये करू नयेत. अशी वक्तव्ये करणाऱ्यांनी यापुढे १०० वेळा विचार करावा, असे म्हणण्याची वेळ मोदींवर आली. आता २३ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील. त्यामध्ये सरकार कुणाचे येणार हे ठरेलच. परंतु, जर भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह यांचा विजय झाला तर ते भाजपच्याच अडचणीचे ठरणार आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपला साध्वींनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत टाकले आहे. आता त्या विजयी झाल्यास संसदेतही विरोधकांच्या टीकेला आणि साध्वींच्या वाचाळ वक्तव्याला आवर घालण्याची कसरत पक्षाला करावी लागणार आहे. 

प्रज्ञासिंहवर कारवाई करा : नितीश कुमार

दुसरीकडे आतापासूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी असणाऱ्य नितीश कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कारवाईची मागणी सुरू केली आहे. तर विरोधकांनी पूर्वीपासूनच यासाठी रान उठवले आहे. भाजपला नुकतेच एका वाचाळवीरावर कारवाई करणे भाग पडले होते. मध्य प्रदेशातीलच गोडसेभक्त भाजप प्रवक्ते अनिल सौमित्र यांनी महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता संबोधन अकलेचे तारे तोडले. त्यांची पक्षाने हकालपट्टी केली. १६ व्या लोकसभेतही भाजपच्या वाचाळवीरांमुळे अनेकदा पक्षाला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी भाजपने आताच वाचाळवीर साध्वीलाही पक्षातून हाकलणे गरजेचे आहे. 

मोदीजी राजधर्म पाळा : नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून देण्यासाठी भलेही आता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हयात नसतील. परंतु, नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी मोदींना राजधर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. सत्यार्थी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरीराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी राजकारणापलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे."

नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा यांना हृदयातून माफ केले नसेल तर त्या भोपाळमधून विजयी होऊ नयेत अशीच प्रार्थना त्यांनी करावी. अन्यथा, त्यांना संसदेत झेलणे पक्ष आणि पक्षनेत्यांना अडचणीचे ठरेल. तसेच नैतिकता म्हणून, गांधी विचारांचे खरे अनुयायी म्हणून साध्वी प्रज्ञांची पक्षातून हकालपट्टी करावी. तरच पुढील नामुष्की टाळता येईल आणि खऱ्या अर्थाने गांधींचा सत्य, अहिंसेचा वारसा सांगता येईल.