Sun, Feb 24, 2019 02:20होमपेज › National › दिल्लीत मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी जेरबंद

दिल्लीत मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी जेरबंद

Published On: Feb 15 2018 2:00AM | Last Updated: Feb 15 2018 1:14AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित बाटला हाऊस एन्काऊंटरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला इंडियन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी अरिज खान ऊर्फ जुनैद याला तब्बल दहा वर्षांनंतर दिल्‍ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. बाटला हाऊस एन्काऊंटवेळी डॅशिंग पोलिस अधिकारी मोहनचंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. अरिज आणि त्याच्या साथीदारांनी देशाच्या विविध भागात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 165 लोकांचा मृत्यू झाला होता.

दिल्‍लीतील गजबजलेल्या जामिया नगरमध्ये 2008 साली बाटला हाऊस एन्काऊंटर झाले होते. त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले होते, तर चौघे जण पळून गेले होते. पसार झालेल्यांत अरिज खानचा समावेश होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोहनचंद शर्मा यांना एन्काऊंटरवेळी अनेक गोळ्या लागल्या होत्या. नंतर त्यांचे रुग्णालयात निधन झाले होते. अरिज खानवर एनआयए आणि दिल्‍ली पोलिसांनी 15 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बाटला हाऊस एन्काऊंटर ही खोटी चकमक होती, असा दावा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या प्रकरणानंतर केला होता. पोलिसांकडून मारल्या गेलेल्यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असेही त्यावेळी काँगे्रसी नेत्यांनी सांगितले होते.

बाटला हाऊस एन्काऊंटरप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला कनिष्ठ न्यायालयाने 2013 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 

अरिज खान याला भारत-नेपाळ सीमारेषेवर पकडण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. एस. कुशवाह यांनी दिली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवाशी आहे. दिल्‍लीतील बाराखंबा रोड, पहाडगंज, कॅनॉट प्लेस, ग्रेटर कैलाश आणि गोविंदपुरी या भागात बॉम्बस्फोटाची मालिका घडल्याच्या सहा दिवसांनी बाटला हाऊस एन्काऊंटर झाले होते. तो व त्याच्या साथीदारांनी देशाच्या विविध भागात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 165 लोकांचा मृत्यू झाला होता, अशी माहितीही कुशवाह यांनी दिली. अरिज खान हा बॉम्ब बनविण्यात तज्ज्ञ असून उत्तर प्रदेश बॉम्बस्फोट मालिका, जयपूरमधले बॉम्बस्फोट व अहमदाबादमधल्या बॉम्बस्फोटातही तो सामील होता.