होमपेज › National › एक हजार वर्षे पुढचं तिकिट देणार्‍या रेल्‍वेलाचं लावला दंड

हजार वर्ष पुढचं तिकिट देणार्‍या रेल्‍वेलाच दंड!

Published On: Jun 14 2018 12:17PM | Last Updated: Jun 14 2018 12:27PMमेरठ (उत्‍तर प्रदेश): पुढारी ऑनलाईन 

एखाद्‍या प्रवाशाने तिकिट घेतले नाही किंवा चुकीच्या स्‍टेशनचे तिकिट घेतले तर त्‍या प्रवाशावर रेल्‍वेकडून लगेच कारवाई केली जाते. त्‍यात गैर काहीच नाही. मात्र, जर रेल्‍वेनेच चुकीचे तिकिट दिले तेही एक हजार वर्षे पुढच्या तारखेचे तर कोणाला विचारायचे? त्‍यात काहीच चुक नसलेल्‍या प्रवाशालाच गाडीतून उतरावे लागले तर कोणाला जबाबदार धरायचे? असाच एक अजब प्रकार २०१३ मध्ये घडला होता. या प्रकाराबाबत संबंधीत प्रवाशाने न्यायालयात दाद मागितल्‍यानंतर न्यायालयाने  नाहक त्रास झालेल्‍या प्रवाशाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेल्‍वे प्रशासनाला दिले आहे.  

त्‍याचं झालं असं, उत्‍तर प्रदेशमधील मेरठ येथील विष्‍णू कांत शुक्‍ला हे सेवानिवृत्‍त प्राध्यापक आहेत. ते १९ नोव्हेंबर २०१३ रोजी हिमगिरे एक्‍सप्रेसने सहारनपूर येथून जौनपूर या मार्गावर रेल्‍वेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्‍यान तिकिट चेकरने शुक्‍ला यांचे तिकिट तपासण्यासाठी मागीतले, शुक्‍ला यांनी ते दिले. त्‍यावेळी तिकिट चेकरने तिकिट पाहिले असता त्‍या तिकिटावर २०१३ ऐवजी ३०१३ ची तारीख असल्‍याचे निदर्शनास आले. मात्र, ही चूक रेल्‍वेची असताना टिकिट चेकरने ७३ वर्षांच्या शुक्‍ला यांना दोषी धरत रेल्‍वेतून मुरादाबाद स्‍टेशनवर उतरविले. 

या प्रकारामुळे शुक्‍ला यांना खूप त्रास सहन करावा लागला. शुक्‍ला यांनी एका वृत्‍त संस्‍थेला याविषयी सांगताना ते म्‍हणाले, ‘‘यावेळी रेल्‍वेत सर्व प्रवाशांसमोर मला अपमानित करण्यात आले. मला ८०० रूपये दंड भरण्यास सांगण्यात आला. तसेच मला मुरादाबाद स्‍टेशनवर जबरदस्‍तीने उतरविले. हा प्रवास माझ्‍यासाठी महत्‍वाचा होता कारण माझ्‍या मित्राची बायको मरण पावल्‍याने मी त्‍याच्या घरी चाललो होतो. मात्र, या प्रकारामुळे मला मित्राच्या घरी जाता आले नाही.’’

यानंतर शुक्‍ला यांनी सहारनपूरमध्ये परतल्‍यानंतर रेल्‍वे विरूध्द ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र, शुक्‍ला यांना न्याय मिळायला पाच वर्षांचा अवधी जावा लागला. पाच वर्षांनंतर न्यायालयाने शुक्‍ला यांच्या बाजूने निर्णय दिला. ज्‍यामध्ये रेल्‍वेला १० हजार रूपयांचा दंड आणि त्‍यात ३ हजार रूपयांची अतिरिक्‍त भरपाई शुक्‍ला यांना देण्याचे आदेश दिले.