Sun, May 31, 2020 13:00होमपेज › National › भाजप विरोधी आघाडीसाठी आता डाव्यांचीही मोर्चेबांधणी

भाजप विरोधी आघाडीसाठी आता डाव्यांचीही मोर्चेबांधणी

Published On: May 15 2019 5:23PM | Last Updated: May 15 2019 5:23PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणूक सुरू असताना राजकीय वर्तुळात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विषय चर्चेत आहे.  दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि भाजपविना तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेषत: तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिसऱ्या आघाडी स्थापन करण्यासाठी बैठका घेत आहेत. याच दरम्यान डाव्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजप विरोधी आघाडीसाठी आम्ही प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे सीपीआयचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी म्हटले आहे. जर एनडीए आणि यूपीएला केंद्रात बहुमत मिळाले नाही तर अशा परिस्थितीत डावे पक्ष महत्वाची भूमिका बजावतील, असा दावाही त्यांनी केला.

डाव्यांचा कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा असणार नाही आणि भाजपचा देखील पाठिंबाही घेणार नाही. आम्हाला भाजपविरोधी आघाडी झालेली हवी आहे. त्यासाठी आम्ही प्रादेशिक पक्षांशी चर्चेस तयार आहोत, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.  

जर का या निवडणुकीत एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा मिळाल्या नाहीत आणि काँग्रेस काही चमत्कार करू शकले नाही तर प्रादेशिक पक्ष तिसरी आघाडी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी तयार असेल. मात्र, त्यांनी ड्रायव्हर सीट मागू नये, असे तेलंगणा राष्ट्र समितीने काल म्हटले होते.