Wed, Feb 20, 2019 14:28होमपेज › National › सत्तेचे निमंत्रण अखेर भाजपलाच

सत्तेचे निमंत्रण अखेर भाजपलाच

Published On: May 16 2018 11:03PM | Last Updated: May 16 2018 11:03PMबंगळूर : पीटीआय/वृत्तसंस्था

कर्नाटकातील मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर सत्ता स्पर्धेचे कर‘नाटक’ प्रचंड रंगात आले असतानाच राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमतापासून फक्‍त 8 जागांनी दूर असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेचे निमंत्रण दिले. राजभवनातून तशी अधिकृत घोषणा करण्यात आली. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र  आलेल्या काँग्रेस-निजद आघाडीला या निर्णयाने मोठा हादरा बसला असून, राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय काँग्रेसने भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

बुधवारी दिवसभर कर‘नाटका’चा सस्पेन्स कायम राहिला. काँग्रेस-निजद आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची स्वतंत्र भेट घेत सत्ता स्थापन करण्याचे दावे-प्रतिदावे केले. यावर राज्यपालांनी कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची ग्वाही दिल्याचे आधीचे वृत्त होते. मात्र, राज्यपाल सत्तेचे निमंत्रण भाजपलाच देणार असल्याची चर्चा सुरू झाली.  राज्यपालांनी आपला अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसताना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा शपथ घेणार असल्याचे ट्विट भाजप आमदार सुरेशकुमार यांनी केल्याने एकच राजकीय खळबळ उडाली.

काँग्रेस-निजद आघाडीकडे स्पष्ट बहुमत असताना बहुमतापासून 8 जागा दूर असलेल्या भाजपला निमंत्रण कसे, असा सवाल करीत राज्यपालांचा हा निर्णय अधिकृतपणे कळताच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय काँग्रेसने दिल्‍लीत झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि रात्री दहाच्या सुमारास भाजपलाच सत्तेचे निमंत्रण देण्यात आल्याचे राजभवनातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. येडियुराप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78, निजदला 37 आणि इतरांना तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने निजदला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर निजदचे कुमारस्वामी यांनी राज्यपाल वाला यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. तर भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांनीही सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. राजभवनाच्या पटलावर चाललेल्या सत्ता स्पर्धेची पहिली फेरी अखेर भाजपने जिंकली. आता बहुमत सिद्ध करण्याची दुसरी व अंतिम फेरी कर्नाटक विधानसभेत होणार असून, बहुमतासाठी 8 आमदार भाजप कोठून मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

फोडाफोडीसाठी भाजपची 100 कोटींची ऑफर : कुमारस्वामी 

कर्नाटकच्या राजकीय मंचावर या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या बातम्याही प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. निजदचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी यांनी भाजपने निजद आमदार फोडण्यासाठी 100 कोटींची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने 10 आमदार फोडल्यास आम्ही भाजपचे 20 आमदार फोडू, असे आव्हानही कुमारस्वामी यांनी दिले. सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण कोणत्या पक्षाला द्यायचे, याचा सर्वस्वी अधिकार राज्यपालांनाच आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना ते भाजपला कसे निमंत्रण देऊ शकतात, असा सवालही त्यांनी केला. भाजपसोबत कदापिही आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

जावडेकर यांचा इन्कार

भाजपचे कर्नाटकातील प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी कुमारस्वामी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. निजद आणि काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. भाजपने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. आरोप करणारा काँग्रेस पक्ष घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे, असे ते म्हणाले. निजद-काँग्रेस आघाडीवर त्यांच्याच पक्षांचे आमदार नाखूश आहेत, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे 11, निजदचे 2 आमदार बैठकीस गैरहजर

बुधवारी भाजपच्या विधिमंडळ बैठकीत येडियुराप्पा यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. निजद आणि काँग्रेसच्याही बैठका झाल्या. काँग्रेस आणि निजदच्या दोन्ही बैठकांना लिंगायत समाजाचे 13 आमदार अनुपस्थित होते. अनुपस्थित आमदारांचा कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसने बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला 11 आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. त्याशिवाय चार आमदार गायब झाल्याने या आमदारांना आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टर पाठवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेसची रक्‍तपाताची भाषा

कर्नाटकच्या राज्यपालांनी काँग्रेस-निजद आघाडीला सत्ता स्थापण्यासाठी आमंत्रण दिले नाही, तर कर्नाटकात रक्‍तपात होईल, असा इशारा  काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला. राज्यपाल संविधानिक मूल्यांचे पालन करत नसतील आणि आम्हाला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करणार नसतील, तर कर्नाटकात रक्‍तपात होईल, असे ते म्हणाले. 

आमदारांवर पहारा

सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच संपर्कात आमदार असल्याचा दावा केल्याने या पक्षांनी आपापल्या आमदारांवर वॉच ठेवला आहे. आज सकाळी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी 78 पैकी केवळ 66 आमदाराच उपस्थित होते. मात्र, हे आमदार वाटेत असून, लवकरच बैठकीला पोहोचतील, असा दावा काँग्रेसने केला. उलट भाजपचे 6 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला. तर भाजपने हा दावा फेटाळून लावत निजद आणि काँग्रेसचेच आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपकडून आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेसचे चार आमदार सकाळपासून गायब झाले असून, त्यांना शोधून आणण्यासाठी काँग्रेसने कलबुर्गी येथे हेलिकॉप्टर पाठविले आहे. त्याशिवाय आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसने रिसॉर्टमध्ये 120 रूम बूक केल्या आहेत. या रिसॉर्टमध्ये सर्व आमदारांची बडदास्त ठेवण्यात येत आहे.

काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू 

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी निजद-काँग्रेस युतीविरोधात निर्णय दिल्यास काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कर्नाटकचा लढा आता न्यायालयापर्यंत पोहोचतो की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील कायदेतज्ज्ञांची फौज यासाठी कामाला लागली आहे. वजुभाई वाला यांनी विरोधात निर्णय दिला, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल आणि विवेक तंखा हे बाजू मांडतील, असे सूत्रांनी सांगितले.
 

Tags : Karnataka, Governor, letter, inviting, BJP, BS Yeddyurappa, government, #KarnatakaElectionResults2018