Tue, Oct 23, 2018 16:59होमपेज › National › न्यायाधीशांचे मुद्दे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर : राहुल

न्यायाधीशांचे मुद्दे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर : राहुल

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 2:20AM

बुकमार्क करा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाच्या चारही न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर आहेत. त्यामुळे निवृत्त न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूसह न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्‍न गंभीर आहेत. काँग्रेस या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहत आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण तर अतिगंभीर आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे.

न्यायाधीशांनी केलेले आरोप लोकशाहीच्यादृष्टीने चिंताजनक आहेत. त्यामुळे या आरोपांनी देशवासीय हादरून गेले आहेत. न्यायपालिकेप्रती देशवासीयांच्या मनात अतिव आदर आहे. त्यामुळे लवकरात लवकर न्यायाधीशांनी केलेल्या आरोपांप्रकरणी तोडगा निघायला हवा, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले. या पत्रकार परिषदेस माजी केंद्रीयमंत्री पी. चिदम्बरम, माजी मंत्री कपिल सिब्बल उपस्थित होते.
तत्पूर्वी, दुपारी न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्यानंतर काँग्रेसने लोकशाही धोक्यात आल्याची ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली होती.

सर्वोच्च न्यायालयातील कामकाज नीट नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयात चुकीच्या पद्धतीने कामकाज चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब अधिक चिंताजनक आहे, असे ट्विटर हँडलरने म्हटले होते.