Tue, Jul 23, 2019 19:01होमपेज › National › आयातीला चाप, निर्यातीला प्राधान्य

आयातीला चाप, निर्यातीला प्राधान्य

Published On: Sep 15 2018 1:50AM | Last Updated: Sep 15 2018 1:36AMनवी दिल्ली : पीटीआय

रुपया सावरण्यासाठी आणि चालू खात्यावरील वित्तीय तूट कमी करण्यासाठी गरजेच्या नसलेल्या (नॉन इसेन्शियल) वस्तूंच्या  आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. रुपयाचे विनिमय मूल्य घसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत रुपया सावरण्यासाठी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी यांना अर्थव्यवस्थेची माहिती दिली. परकीय गंगाजळीत वाढ करण्याच्या हेतूने आणि चालू खात्यावरील वित्तीय तूट कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. अत्यावश्क नसलेल्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

निर्यातीला जास्तीत जास्त चालना देण्यासह विदेशातील वित्तीय संस्थांकडून कर्ज उचलण्यासाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयात करण्यात येणार्‍या वस्तूंची नावे मात्र जाहीर केली नाहीत. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या कराराच्या अधीन राहून आणि संबंधित मंत्रालयाशी चर्चा करून विदेशातून आयात करण्यात येणार्‍या वस्तूंवर निर्बंध लादले जातील, असेही जेटली यांनी नमूद केले. 12 सप्टेंबर रोजी रुपयाचे मूल्य 72.91 रुपये नीचांकी पातळीवर गडगडले होते. रुपयाच्या मूल्याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरही परिणाम होत असून, इंधनाचे दरही भडकले आहेत.