Wed, Feb 20, 2019 14:28होमपेज › National › कुमारस्वामींनी घेतली राज्यपालांची भेट, मिळाले हे उत्तर

कुमारस्वामींनी घेतली राज्यपालांची भेट, मिळाले हे उत्तर

Published On: May 16 2018 6:22PM | Last Updated: May 16 2018 7:04PMबंगळुरु : पुढारी ऑनलाईन

जेडीएसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याची संधी मिळावी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत घटनात्मकरित्या योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे. राज्यपालांशी झालेल्या चर्चेची माहिती कुमारस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

कर्नाटकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले. निकालानंतर काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिल्याने जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला. यापूर्वी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. कर्नाटची सत्ता कुणाच्या हाती जाणार यासाठी आता राज्यपालांच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेडीएस आणि काँग्रेस एकत्र येणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करुन राज्यपालांवर दबाव आणू शकतात असे सांगत कुमारस्वामींनी भाजपच्या राजकीय खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कमी जागा मिळाल्या असूनही काँगेस आम्हाला मुख्यमंत्रीपद देत असल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचेही आभार मानले होते.

गोवा आणि मेघालयमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा डाव आता काँग्रेसने खेळला आहे. सध्याच्या घडीला भाजपही पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे कर्नाटकची सत्ता नेमकी कुणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून कर्नाटक निवडणुकीकडे पाहिले गेले. जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने निकालानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसची प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लागली आहे.