Sun, Apr 21, 2019 06:00होमपेज › National › तिकीट न मिळाल्याने काँग्रेसच्या नेत्याने पिले विष

तिकीट न मिळाल्याने काँग्रेसच्या नेत्याने पिले विष

Published On: Nov 09 2018 6:37PM | Last Updated: Nov 09 2018 6:37PMग्वाल्हेर : पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत आपल्याला तिकीट न मिळाल्याने काँग्रेसमधील एका नेत्यांने चक्क विष पिल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रेमशंकर कुशवाह असे या नेत्याचे नाव आहे. 

कुशवाह यांना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये काँग्रेस नेत्यांची रीघ लागली आहे.

प्रेमसिंग कुशवाह यांनी ग्वाल्हेर दक्षिण आणि ग्वाल्हेर पूर्व विधानसभेच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितले होते. मात्र, काँग्रेसकडून त्यांना एकाही जागेवर तिकीट दिले नाही. काँग्रेसने ग्वाल्हेर दक्षिण येथून सुरेश पचौरी यांचे समर्थक प्रवीण पाठक यांना तिकीट जाहीर केले. पाठक यांच्या उमेदवारीची घोषणा होताच कुशवाह नाराज झाले. तर पाठक यांच्या नावाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पोस्टर फाडली. कुशवाह यांनी आपल्या समर्थकांसह जयविलास पॅलेससमोर आंदोलन केले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कुशवाह यांनी अखेरीस विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.