होमपेज › National › गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर

गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर

Published On: Jun 14 2018 10:44AM | Last Updated: Jun 14 2018 10:44AMबेंगळुरू : पुढारी ऑनलाईन

जेष्‍ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्‍टवर होते. पोलिस तपासात ही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के. टी. नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा संशयीत आरोपींना अटक केली आहे. एसआयटीने आरोपींकडून एक डायरी जप्त केली आहे. यात सांकेतिक भाषांचा वापर असून गिरीश कर्नाड, बी टी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची नावे या डायरीत असल्याचे समोर आले आहे. द्वारकानाथ यांनी प्रभू राम अस्तित्वात नाही, असे विधान केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘डायरीत नावं असलेली सर्व मंडळी ही गौरी लंकेश यांचे समर्थक होते किंवा लंकेश यांच्या विचारांशी सहमत होते. त्या सर्वांनी वेळोवेळी हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती’, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. सांकेतिक भाषेची उकल केली जात असून, यानंतर नेमकी माहिती समजू शकेल’, असे एसआयटीमधील सूत्रांनी सांगितले.

दरम्‍यान, लंकेश यांच्या हत्‍येप्रकरणी अटक करण्यात आलेल्‍या सहा जणांपैकी परशूराम वाघमारे यानेच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाघमारेसारखी दिसणारी आहे. परशूराम वाघमारे हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समारे आली आहे.