Sat, Aug 24, 2019 11:12होमपेज › National › प्रियंका, राहुल यांचा रोड शो

प्रियंका, राहुल यांचा रोड शो

Published On: Feb 11 2019 8:40AM | Last Updated: Feb 11 2019 7:57PM
लखनौ : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी लखनौ शहरातून रोड शो केला. काँग्रेस आता फ्रंटफूटवर असल्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले.

प्रियंंका यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील होते. लखनौ विमानतळापासूनच उघड्या बसमधून त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हेदेखील त्यांच्यासमवेत होते. रोड शोला एकच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रोड शोमध्ये सामील झालेले पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात राफेल विमानाची प्रतिकृती होती. ते स्वतःच ‘चौकीदार चोर हैं’ अशा  घोषणा देत होते. ते पाहून कार्यकर्त्यांनीही  घोषणा देण्यास सुरुवात केली. रोड शोमध्ये कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह दिसून येत होता. उघड्या बसमधून हा रोड शो सुरू होता. एका ओव्हरब्रिजजवळ आल्यानंतर सर्वच नेत्यांना बसमध्ये खाली बसावे लागले.

त्यानंतर काही अंतर पार करताच पुन्हा विजेच्या तारांमुळे त्यांना सुरक्षा रक्षकांनी खाली बसणे भाग पाडले. रोड शोनंतर झालेल्या रॅलीमध्ये बोलताना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बॅकफूटवर नव्हे; तर फ्रंटफूटवर खेळणार असल्याचे सांगितले. पक्षाने 2022 मध्ये होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्याची जबाबदारी प्रियांका  आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपविल्याचे त्यांनी सांगितले. जेथून काँगे्रसची सुरुवात झाली त्या उत्तर प्रदेशात पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांच्यावर राज्याची पूर्ण जबाबदारी सोपविली आहे. राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणणे या ध्येयाच्या दिशेने दोघे पक्ष कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींवर जोरदार टीका

राहुल गांधी यांनी या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांना गोरगरिबांचा अजिबात कळवळा नाही. त्यांना काळजी आहे ती फक्‍त अनिल अंबानी आणि इतर बड्या उद्योगपतींची, असे राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी यांची नक्‍कलही केली.

रॉबर्ट वधेरा यांनी दिल्या शुभेच्छा

उत्तर प्रदेशातील आपल्या नव्या प्रवासाला आणि देशातील जनतेच्या सेवेसाठी माझ्या आपल्याला शुभेच्छा. आपण माझ्या बेस्ट फ्रेंड, परफेक्ट वाईफ आणि माझ्या मुलांच्या बेस्ट मदर आहात. देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहेत. अशा परिस्थितीत मी आपल्याला देशसेवेसाठी पाठवित आहे. देशातील जनतेने आपली योग्य काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा.